राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी ठाकरे यांची जबाबदारी ठरवत, त्यांच्या निष्क्रियतेवरही सवाल उपस्थित केला.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेसचा अपमान केला आहे. त्यांच्या हट्टागिरीमुळेच काँग्रेसचा मागील निवडणुकीत पराभव झाला. बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हट्टाने अधिक जागा घेतल्या. काँग्रेसला दुय्यम ठरवलं. परिणामी अडीच वर्षांच्या अपयशी ठाकरे सरकारचा संपूर्ण फटका काँग्रेसला बसला. विधानभवनात गैरहजर राहून आणि प्रशासनात निष्क्रिय राहून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची भूमिका केवळ नावापुरतीच बजावली. याच निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली सत्ता विरोधी लाट काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेसलाही थेट संदेश दिला की, त्यांनी ठरवावं की त्यांना अजून किती अपमान सहन करायचा आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा युती करायची की नाही, हे काँग्रेसने आता स्पष्ट करावं. मात्र, जनतेच्या मनात एक गोष्ट ठामपणे रुजली आहे की, काँग्रेसचा अपयश उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या राजकारणामुळेच आहे. सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांचे वागणे हे केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी होते. काँग्रेसला कमी लेखून त्यांनी स्वतःची जागा वाढवली. मात्र यामुळे काँग्रेसची राजकीय पतच घसरली. काँग्रेसच्या हतबल नेतृत्वामुळे पक्षाची अवस्था आणखीच दयनीय बनली, अशी परखड टीका बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे यांनी यावेळी केंद्र सरकारच्या ‘हाउसिंग फॉर ऑल’ या योजनेचाही विशेष उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केलं की, कोणतीही गरजू व्यक्ती या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकार आणि राजस्व विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी सरकार गरिबांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. मात्र, जिथे काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील दुर्बल घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी यंत्रणा अधिक सजगपणे काम करत आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानुसार कोणतीही योजना कोणालाही वंचित ठेवणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
अराजकतेचा इशारा
मनसेकडून स्थलांतरितांवर होणाऱ्या मारहाणीच्या प्रकारांवरही बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. इतर राज्यांतील लोक अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहत आहेत. इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाले आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात जन्मलेले अनेक इतर भाषिक नागरिक आज चांगली मराठी बोलतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणं चुकीचं आहे. सरकारनं अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठी लोकही इतर राज्यांत राहतात, उद्या त्यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडू शकतो. त्यामुळे देशात अराजकता निर्माण करणारी ही मानसिकता अत्यंत घातक आहे, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
बच्चू कडू यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप करताना बावनकुळे म्हणाले की, मी आणि माझे मंत्री साडेचार तास बच्चू कडूंसोबत मंत्रालयात बसलो होतो. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून तोडगा काढला गेला. आता आगामी विधीमंडळ अधिवेशनात या प्रश्नांवर अभ्यास करणाऱ्या समितीची घोषणा केली जाईल. ही समिती महाराष्ट्र दौरा करून विविध समस्यांचा सखोल अभ्यास करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. बावनकुळे यांनी स्पष्टपणे लिहून दिलं आहे की, शेतकऱ्यांची कर्जमाफी आमचंही प्राथमिक लक्ष्य आहे. आम्ही आमच्या निवडणूक जाहीरनाम्यातही त्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आमचा दृष्टिकोन ठाम आहे. जनतेच्या भल्यासाठी आमचं धोरणही स्पष्ट आहे.