20 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर टीका केली.
मुंबईच्या एनएससीआय डोममध्ये 5 जुलै रोजी इतिहास जणू पुन्हा जिवंत झाला. तब्बल 20 वर्षांच्या अंतरानंतर ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्रिभाषा सूत्रावरून उभा राहिलेला मुद्दा युतीचा निमित्त ठरला. एकमेकांपासून राजकीयदृष्ट्या दूर गेलेले हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येणार, ही बातमी खुद्द राजकारणातच खळबळ माजवणारी ठरली. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, अशा ठाम शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र राज ठाकरे मात्र युतीबाबत जरा सावध वाटले. त्यांच्या भाषणात भविष्यकालीन जोखमींची झलक होती, जे त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर जोर देणाऱ्या शैलीशी सुसंगत ठरते.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या युतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले गेल्या 25-30 वर्षांत जे जे नेते शिवसेना सोडून गेले, त्यांना जर योग्य वेळी समजून घेतलं असतं, एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असता, तर आज शिवसेना दुभंगलीच नसती. जयस्वालांनी स्पष्ट आरोप केला की, उद्धव ठाकरे यांच्या ‘उबाठ्या नेतृत्वा’मुळेच शिवसेनेत फूट पडली. स्वकीयांना दूर ठेवल्यामुळेच ही वेळ आली. राज ठाकरे यांना एकही जागा न देता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
शिवसेनेची चुकलेली दिशा
आता जेव्हा मतांची गरज भासते, तेव्हा मात्र पुन्हा बंधुभावाची आठवण येते, असा कटाक्ष त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केलेल्या गरीब अधिक गरीब होतोय, श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय या विधानावरही जयस्वाल यांनी वेगळी मते मांडली. त्यांनी सांगितले की, सध्याच्या धोरणांमुळे आर्थिक विषमता कमी होत आहे. गरीबांचे उत्पन्न वाढत आहे, फायनान्शिअल फोर्स वाढतोय. भविष्यात विषमता कमी होईल, असा मला विश्वास आहे. जयस्वाल यांचे वक्तव्य केवळ ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीबाबत नव्हते, तर शिवसेनेच्या एकूण ऐतिहासिक वाटचालीवर आणि महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर सखोल भाष्य करणारे होते.
जयस्वाल यांच्या मतानुसार, आता जे काही एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते जर पूर्वीच झाले असते, तर महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्या वळणावर असते.या सर्व घडामोडींमध्ये एक प्रश्न मात्र सतत डोकं वर काढतो. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तरी, ते राजकीयदृष्ट्या एकत्र चालू शकतील का? की ही युती केवळ निवडणूकपूर्व नौटंकी ठरेल? एकमेकांपासून राजकीय पातळीवर दूर गेलेले दोन नेते, एकत्र येणं हे ऐतिहासिक क्षण असू शकतो, पण त्यामागचा हेतू आणि आगामी दिशा हीच खरी उत्सुकतेची गोष्ट आहे. राजकारणात काहीही अंतिम नसतं हेच पुन्हा एकदा सिद्ध होतंय.