महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेच्या सन्मानासाठी राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत मोर्चा काढताना नागपूरात महापालिकेला मराठी फलकांसाठी थेट इशारा देण्यात आला.
मुंबई आणि नागपूरसह राज्यभरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मंगळवारी मीरा-भाईंदर शहरात मनसेच्या वतीने मराठी हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलनाच्या तीव्रतेपुढे अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागले. दुपारी मोर्चाला परवानगी देण्यात आली. या मोर्चाला राज्यातील मंत्र्यांचाही पाठिंबा लाभला.
मुंबईतील या मोर्चानंतर नागपूर शहरातही मनसेने मराठी फलकांच्या मुद्यावर अधिकृतपणे भूमिका घेत महापालिकेला थेट इशारा दिला. मराठी भाषेच्या वापराबाबत सरकारी यंत्रणांमध्ये होत असलेल्या दुर्लक्षावर मनसेचे नागपूर अध्यक्ष विशाल बडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
Chief Justice Bhushan Gavai : 22 वर्षांची सेवायात्रा न्यायासाठी
मोर्चावर पोलिसांचा दबाव
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी मनसेने मराठी अस्मितेसाठी एकत्र येण्याचे ठरवले. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी त्याला परवानगी नाकारत मनसैनिकांवर कारवाई सुरू केली. सोमवारपासूनच मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिस पाठवण्यात आल्या. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचे निवासस्थान पोलीस फौजफाट्यासह घेरण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. तरीही जाधव यांनी आपली भूमिका ठाम ठेवत मराठी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सध्या त्यांना काश्मीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटेच अटक करण्यात आली. जयेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, राकेश वैती, प्रवीण भोईर, विनोद मोरे, संजय मेहरा, दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर आणि पांडुरंग लोखंडे यांना विविध पोलीस ठाण्यांत ठेवण्यात आले. तरीही मराठीप्रेमी नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेत मनसेच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला. हे लक्षात घेऊनच राज्य सरकारने मवाळ भूमिका घेत मोर्चाला अधिकृत परवानगी दिली. प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत मराठी जनतेच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात, असे सांगितले.
Nagpur : वीज निर्माणात अदानीची भरारी, विदर्भात आर्थिक परिवर्तनाची तयारी
मराठीसाठी ताकद
नागपूरमध्येही मनसेने मराठीसाठी आवाज उठवला. शहराध्यक्ष विशाल बडगे यांनी दिघोरी येथील महापालिकेच्या नव्या इमारतीवर इंग्रजीत फलक लावण्यात आल्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांना निवेदन देत स्पष्ट मागणी केली की, सार्वजनिक स्वच्छता गृहावर तसेच शासकीय इमारतींवर मराठी फलक लावले पाहिजेत. बडगे यांनी थेट इशारा दिला की, जर हे फलक तातडीने मराठीत बसवले गेले नाहीत, तर संबंधित इमारतीचे लोकार्पण होऊ दिले जाणार नाही. मनसेच्या या भूमिकेला नागपूरातील स्थानिक मराठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मनसेचा हा मराठीसाठीचा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो महाराष्ट्रभर जागृती निर्माण करणारा ठरतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी, शासनाने आणि खासगी कंपन्यांनीही मराठी भाषेचा सन्मान ठेवावा, अशी अपेक्षा आहे. मनसेच्या पुढाकारामुळे मराठी भाषेच्या सन्मानासाठी नवीन चळवळ आकार घेत आहे. ही लढाई केवळ भाषेची नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. राज्यात मराठीला न्याय देणाऱ्या धोरणांची गरज स्पष्ट करत, मनसेने पुन्हा एकदा ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.