महाराष्ट्र

Cooperative Bank election : मतांच्या लढाईत हातघाईचा प्रसंग

Chandrapur : दिनेश चोखरे विरुद्ध सुभाष रघाटाटे यांचा तुफान वाद

Author

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दोन उमेदवारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे मतदान केंद्रावर तणाव वाढला आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी 10 जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीत वातावरण चांगलेच तापले. चंद्रपूर तालुका ‘अ’ गटातून निवडणूक लढवणारे उमेदवार दिनेश चोखरे आणि सुभाष रघाटाटे यांच्यात थेट मतदान केंद्रातच वाद झाला. इंडस्ट्रियल इस्टेट येथील मतदान केंद्रावर दोघांमध्ये झालेला शाब्दिक वाद क्षणातच धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी रस घेतल्याने सुरुवातीपासूनच ही निवडणूक चांगलीच गाजू लागली होती. जवळपास 13 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय समीकरणे प्रचंड बदलली. अनेक युती तुटल्या, तर काही नव्या युती उदयास आल्या. मतदानाच्या दिवशी मात्र घडलेल्या या अप्रिय घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Devendra Fadnavis : कृषी यंत्रणेला मिळणार तपासणीचे विशेष अधिकार

वादाचे रुपांतर हाणामारीत

इंडस्ट्रियल इस्टेट येथे असलेल्या मतदान केंद्रावर सकाळीच चोखरे आणि रघाटाटे यांच्यात जोरदार वाद झाला. काही आक्षेपार्ह बाबींवरून सुरू झालेला शाब्दिक वाद काही क्षणांतच शिवीगाळ व धक्काबुक्कीपर्यंत गेला. या वादामुळे दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांसमोर आले. केंद्रावर तणाव निर्माण झाला. उमेदवारांच्या समर्थकांनी परिस्थिती अधिक बिघडवू नये म्हणून प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केला.

घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींचा मतदान केंद्र परिसरात प्रवेश बंद केला आहे. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे या घटनेपूर्वी सुभाष रघाटाटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचे मुख्य दरवाजे आतून बंद करत केंद्र अडवण्याचा प्रयत्न केला, तर दिनेश चोखरे यांच्या समर्थकांनी बाहेरून दरवाजे ठोठावत याचा निषेध केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापले.

Chandrashekhar Bawankule : तुकडेबंदीचा ताबूत झाला, ठोकला अखेरचा खिळा 

मतदान प्रक्रियेला अडथळा

मतदान केंद्रावरील गोंधळामुळे मतदारांची गैरसोय झाली असून, काही वेळ मतदान प्रक्रियेस अडथळा निर्माण झाला. यामुळे दिनेश चोखरे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची अधिकृत मागणी केली आहे. त्यांच्या मते, अशा अस्थिर वातावरणात पारदर्शक मतदान होणे शक्यच नव्हते. घडलेल्या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 14 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शंभरहून अधिक अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी 11 जुलै रोजी चंद्रपूरच्या चांदा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होणार आहे.

निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांपैकी 13 उमेदवार विनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 8 जागांसाठी मतदान झाले आहे. यात ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती व भटक्या-विमुक्त गटाचा समावेश आहे. अ गटात एका मताची किंमत सुमारे 5 लाख रुपये तर ब गटात 15 ते 20 हजार रुपये इतकी आहे. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

निवडणुकीत काँग्रेसकडून खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समन्वय साधत बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे भाजपने आमदार बंटी भांगडिया व किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत संवेदनशील झाली आहे. मतदान केंद्रावर घडलेल्या या गोंधळामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर सावली पडली आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आक्रमक भूमिका प्रशासनासाठीही मोठे आव्हान ठरत आहे. आता मतमोजणीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!