शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रीय पाठिंबा मिळाला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील या लढ्याला राज ठाकरे यांचीही ताकद लाभली आहे.
महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे राज ठाकरे आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठीही मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील “सातबारा कोरा करा” आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू झालेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेच्या मुद्द्यावर भक्कम भूमिका घेतली होती. त्यानंतर 20 वर्षांनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेसाठी संयुक्त सभा घेतली. आता शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठीही त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.
Nagpur : सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघातच विकासकामांची लाजिरवाणी स्थिती
लाखखिंड यात्रेची भेट
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथे सुरू असलेल्या ‘सातबारा कोरा करा’ यात्रेला भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा जाहीर केला. या भेटीदरम्यान त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्याशी संवाद साधून आंदोलनाला मनसेच्या पूर्ण समर्थनाचे आश्वासन दिले. यासंदर्भात मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून देखील एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांच्या सातबाऱ्यावरून सरकारने केलेल्या फसव्या आश्वासनांविरोधात हे आंदोलन अत्यंत आवश्यक आहे. मनसे त्यामागे ठामपणे उभी आहे.
सात जुलैपासून सुरू झालेल्या या यात्रेची सुरुवात पावसातही ठाम निर्धाराने झाली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, या घोषणेने सुरू झालेल्या या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले. ही यात्रा केवळ पदयात्रा नसून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिला जाणारा निर्णायक लढा असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना दरमहा 6 हजार रुपये मानधन, मेंढपाळांना चाराई क्षेत्राचा अधिकार, तसेच इतर 17 महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या समर्थनार्थच ‘सातबारा कोरा करा’ यात्रा राज्यभर लक्षवेधी ठरत आहे.
Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे
सरकारच्या विस्मरणावर संतप्त
देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यावर या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याच विस्मरणावरून संतप्त होऊन बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून मागण्या विचाराधीन घेतल्या जातील, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. याच मुद्द्यावरून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही समिती न लागता तातडीने निर्णय घेणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मात्र वेळकाढूपणा का केला, यावर संताप व्यक्त केला.