महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : फोल ठरली टास्क फोर्स, जनता केवळ ‘मनी सोर्स’

Gadchiroli : डासांच्या धुमाकूळात विजय वडेट्टीवारांचा झंझावात

Author

गडचिरोलीत एका उपोषणाने खदखदते आरोप उफाळले आणि वडेट्टीवारांच्या येण्यानं सत्ताधाऱ्यांचं रक्तच सळसळलं. बनावट भरतीपासून अफरातफरीपर्यंत अन् टास्क फोर्सच्या नावाखाली खर्च झालेल्या कोट्यवधींचं बिंगच उघडलं.

जिल्हा परिषदेमधील कारभार, अंगणवाडी भरतीतील संशयास्पद नेमणुका आणि भामरागडमधील विकास कामांमधील कथित अफरातफर यावरून अखेर जिल्ह्याच्या धगधगत्या जमिनीवर एक स्फोट घडला. अहेरी तालुक्यातील अंगणवाडी भरतीमध्ये बनावट गुणपत्रिकांच्या आधारे भरती झाल्याचा आरोप करत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी 9 जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत 10 जुलै रोजी जोरदार राजकीय हालचाली घडल्या. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी थेट उपोषणस्थळी धडक दिली आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर घणाघात करत एकच सवाल विचारला की, ही सत्तेची बंद जागा आहे की भामट्यांची खुले मैदान?

जिल्ह्याचा कारभार वाऱ्यावर

वडेट्टीवार यांनी या वेळी प्रशासनाची जोरदार कानउघाडणी केली. अहेरीतील भरती प्रक्रियेतील निवड समिती ही संपूर्णपणे संदेहाच्या भोवऱ्यात आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नेमणुका झाल्या आहेत. ही निवड समिती त्वरित बरखास्त करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी करत त्यांनी जिल्हा प्रशासनाला थेट लक्ष्य केलं.

वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर थेट प्रश्नांची सरबत्ती केली. लोकशाहीत अशा भोंगळ कारभाराला मुभा दिली गेली तर हा जिल्हा अंधारात जाईल, अशी खरमरीत टीका करत त्यांनी जनतेच्या भावनांना हात घातला.

Parinay Fuke : आत्मघातकी विचारांचा देवाभाऊंनी केला बंदोबस्त

भामरागडचा भ्रष्टाचार

भामरागड येथील गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्यावर विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर केल्याचा आरोप आहे. विभागीय चौकशी सुरू आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यांचं बदली आदेश निघूनही कार्यमुक्ती केली जात नाही. यावरून वडेट्टीवारांनी एक गंभीर आरोप केला की, जर वरिष्ठ अधिकारीच अशा भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणार असतील, तर गडचिरोलीचं भवितव्य धोक्यात आहे.

वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं की, हे सर्व प्रश्न ते विधानसभेत सोमवारी आणि मंगळवारी मोठ्या आवाजात मांडणार आहेत. “लोकशाहीची शुद्धीकरण मोहीम आता आमच्याच हातून सुरू होणार,” अशी गर्जना करत त्यांनी उपोषणकर्ते अजय कंकडालवार यांना सरबत देत उपोषण मागे घ्यायला लावलं. यावेळी काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, महिला काँग्रेसच्या अॅड. कविता मोहोरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

स्फोटक सवाल

मलेरियामुक्त गडचिरोलीसाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च झाले आणि त्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमली गेली. मात्र जिल्ह्यात अजूनही दोन हजार 500 हून अधिक मलेरिया रुग्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी जोरदार सवाल उपस्थित केला. मग ही टास्क फोर्स काय करतेय? केवळ बुलेटिनमध्ये आकडे आणि प्रत्यक्षात मृत्यू, हा विरोधाभास का? ते म्हणाले, टास्क फोर्सच्या नावाखाली जनतेच्या पैशातून कोणाचे खिसे भरत आहेत हे तपासायला हवं. जर प्रशासन इतकं निष्क्रिय असेल तर ही टास्क फोर्स म्हणजे एक ‘शासकीय दिखावा’च.

गडचिरोलीत विकासाच्या नावावर सुरू असलेली निव्वळ बोलाची कढी आणि बोलाचं भात या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांचा आवाज जनतेला प्रतिनिधित्व देणारा ठरत आहे. भ्रष्टाचार, बनावट भरती, आणि अपयशी आरोग्य मोहीम यांचं एकत्रित चित्र उलगडत आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, नाहीतर गडचिरोलीसारखा संवेदनशील जिल्हा अधिकच खोल अंधारात जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!