राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 व्या वर्षी नेत्यांनी निवृत्त व्हावे, असे वक्तव्य नागपूरमध्ये केले. या विधानावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राजकीय वातावरण तापवले आहे.
नागपूरमध्ये झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यामध्ये, नेत्यांनी पंचाहत्तरी गाठल्यावर बाजूला व्हावे, असे म्हणत नेतृत्वातील वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दिवंगत संघ विचारवंत मोरोपंत पिंगळे यांच्या विचारांचा संदर्भ देत हे विधान केल्याचे स्पष्ट केले, परंतु हे भाष्य थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने असल्याचा आरोप काँग्रेसने करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि इतर विरोधकांनी हा मुद्दा लपवून ठेवलेले संकेत नाहीत, अशी टीका करत थेट मोदी यांच्या निवृत्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत दोघेही येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्षांचे होणार आहेत.
Vijay Wadettiwar : अळ्या मुलांच्या आहारात, वडेट्टीवारांचे फटके सभागृहात
परिवर्तनाचे सूचक विधान
नागपूर येथे ‘मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात पिंगळे यांच्या विचारांचा दाखला देताना सांगितले की, जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते, तेव्हा ती थांबण्याची वेळ असते. वय झालं आहे, बाजूला व्हावं आणि दुसऱ्यांना काम करू द्यावं. या वक्तव्यानंतर काँग्रेसने मोहन भागवत यांच्या या विधानाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेला अप्रत्यक्ष इशारा असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लिहिले, बेचारा पुरस्कारजीवी पंतप्रधान! पाच देशांच्या दौऱ्यावरून परत येताना संघ प्रमुखांनी त्यांना आठवण करून दिली की 17 सप्टेंबर 2025 रोजी ते 75 वर्षांचे होतील. रमेश यांनी असेही नमूद केले की, पंतप्रधान मोदींनी देखील सरसंघचालकांना आठवण करून द्यावे की तेही 11 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. एक दगड, दोन पक्षी.
वादात काँग्रेसचे दुसरे नेते पवन खेऱा देखील सहभागी झाले. त्यांनी म्हटले की, आता दोघांनी आपापली झोळी उचलून एकमेकांना मार्गदर्शन करायला जावे. खेऱा यांनी या वक्तव्याला ‘चांगली बातमी’ म्हणत मोदी व भागवत या दोघांवर संविधान व देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. पुढे त्यांनी टोमणा मारत म्हटले की, पंतप्रधान जर राजकारणात नसते, तर कदाचित ते बॉलिवूडमध्ये गेले असते. बॉलिवूड वाचलं, पण देश वाचू शकला नाही. शिवसेना ठाकरे गट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मोदींच्या नागपूर येथील संघ मुख्यालय भेटीमागे निवृत्तीचा संकेत होता. अनेक वर्षांनंतर त्यांनी मुख्यालयाला दिलेली भेट म्हणजे संघातील नेतृत्वबदलाची सुरुवात आहे. मात्र, भाजपने हे दावे फेटाळले असून ती एक नियमित भेट होती, असे स्पष्ट केले.
Abhijit Wanjarri : आमदारांनी सांगितली घर नसलेल्या घरकुलांची कहाणी
निवृत्तीविषयक विधान चर्चेत
मोरोपंत पिंगळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक अत्यंत आदरणीय प्रचारक होते. त्यांच्या विचारांना आणि जीवनकार्याला समर्पित असलेल्या या पुस्तक प्रकाशनावेळी भागवत यांनी त्यांचे तत्त्वज्ञान आणि दूरदृष्टी यांचे मोठे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पिंगळे अत्यंत साधेपणाने मोठमोठ्या संकल्पना समजावून सांगत असत. त्यांनी जे विचार मांडले ते आजही मार्गदर्शक ठरतात.
साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अलीकडेच निवृत्तीनंतरच्या आयुष्याविषयी व्यक्त केलेले विचारही चर्चेत आले आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शहांनी सांगितले की, ते आपल्या निवृत्तीनंतरचे जीवन वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीला समर्पित करणार आहेत. या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये वयोमर्यादा, उत्तरदायित्व आणि नेतृत्वपरिवर्तन या मुद्यांवर नव्याने प्रकाश पडत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर अप्रत्यक्ष दडपण आणण्यासाठी हे सूचक विधान असल्याची चर्चा सध्या देशभरात रंगली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची विधानं होत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.