चंद्रपूरला देवा भाऊ आणि विकासपुरुषांच्या गावाशी जोडणारी कनेक्टिव्हिटीची अवस्था ढासाळली आहे. या महामार्गावर खड्ड्यांचा कहर पाहता खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक झाल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशभरात महामार्गांचे ‘सप्तरंगी जाळे’ विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, या दोघांचंही गाव म्हणजे नागपूर. पण ज्या नागपूरला ‘विकासाचं पोस्टरबॉय’ म्हणून जगभरात दाखवलं जातं, त्या शहराकडे जाणारा चंद्रपूर-नागपूर महामार्ग मात्र दयनीयतेच्या सीमारेषा ओलांडून आता जीवघेणा ठरत आहे. याच रस्त्यावर प्रवास करणाऱ्या जनतेच्या वेदनांचा आवाज बनत, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एक आक्रमक आणि थेट भूमिका घेतली आहे.
महामार्गाच्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आता केवळ गडगडत्या वाहनांचे नव्हे, तर प्रवाशांच्या संयमाचेही कसोटीत घेत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या आगमनानंतर या खड्ड्यांची खोली आणि धोक्यांची व्याप्ती वाढली आहे. अशा संकटमय रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे थेट जीवाशी खेळ करण्यासारखं झालं आहे. भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, अशी इशारासदृश जाणीव खासदार धानोरकर यांनी आपल्या अधिकृत पत्रात नोंदवली आहे.
शापित अनुभव
सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना लिहिलेल्या या पत्रात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर बांधलेला हा महामार्ग ‘विकासाचं प्रतीक’ न बनता नागरिकांच्या शापित अनुभवाचं केंद्रबिंदू ठरत आहे. जेव्हा दर्जेदार रस्ता मिळत नाही, तेव्हा टोल वसुली करणे म्हणजे सरळसरळ शासकीय पातळीवरचा अन्याय, असा संतप्त सूर त्यांनी या पत्रात उमटवला आहे.
चुकीच्या रस्त्यासाठी बिनदिक्कत टोलवसुली म्हणजे नागरीकांवरचा दुहेरी आर्थिक आघात आहे, असं स्पष्टपणे सांगत धानोरकर यांनी टोल थांबवण्याची आणि तात्काळ रस्त्याची डागडुजी सुरू करण्याची मागणी केली आहे. ‘विकासाच्या गप्पा आणि खड्ड्यांच्या फक्त खुणा’ असं याच महामार्गाचं वास्तव होऊ लागल्याने, नागरिकांमध्येही तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे.
Chandrashekhar Bawankule : गरिबांच्या हक्काची जमीन आता त्यांच्या नावे
कार्यवाहीसाठी लढा सुरू
खासदार धानोरकर यांनी लिहिलेलं हे पत्र केवळ एक तक्रार नाही, तर प्रशासनाला कार्यवाहीसाठी लावलेली जाणीवपूर्वक ठणक आहे. यामध्ये त्यांनी खालील तीन स्पष्ट मागण्या केल्या आहेत. यामध्ये चंद्रपूर-नागपूर महामार्गाची तात्काळ आणि प्रभावी दुरुस्ती करण्यात यावी. तो पूर्णपणे वाहतुकीसाठी सुस्थितीत होईपर्यंत टोलवसुली त्वरित थांबवावी. याबाबतची संपूर्ण जबाबदारी घेऊन संबंधित यंत्रणांनी प्रकल्पाच्या दर्जाबाबत नागरिकांसमोर स्पष्टीकरण द्यावं, या तीन मागण्यांचा समावेश आहे.
खासदार धानोरकर यांनी या पत्राची प्रत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, चंद्रपूर आणि प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण, चंद्रपूर यांना देखील पाठवून, या विषयावर एक सामूहिक जबाबदारी निर्माण केली आहे. चंद्रपूरहून नागपूरसारख्या शहराला जोडणारा हा महामार्ग, आज एका दुर्दशेचं प्रतीक बनला आहे. जेथे देशभरातून स्मार्ट सिटी, एक्सप्रेसवे आणि बुलेट ट्रेनच्या घोषणा होत आहेत, तिथे चंद्रपूर-नागपूरसारखा कनेक्टिव्हिटी महत्त्व असलेला रस्ता जर नागरिकांना धोका पोचवत असेल, तर विकासाचा खरा अर्थ कुठे शोधायचा?
आशा निर्माण
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ज्या ठामपणे ही भूमिका घेतली आहे, ती चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी एक दिलासा ठरत आहे. आता या आवाजातून प्रशासन जागं होईल, रस्ता सुस्थितीत येईल आणि महामार्ग प्रवास पुन्हा एकदा ‘सुरक्षित आणि सुगम’ बनेल, अशी आशा निर्माण झाली आहे.