राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठा बदल झाला आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेली सात वर्षे पक्षाचे नेतृत्व नेटाने सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच आपण या पदातून मुक्त व्हावे, अशी नम्र विनंती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आज त्यांनी अधिकृतरित्या पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी आता माजी मंत्री आणि विधान परिषदेतील प्रमुख प्रतोद शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जयंत पाटील यांनी सात वर्षांच्या कार्यकाळात पक्षाच्या संघटनेला मजबुती दिली, विविध आंदोलनांत नेतृत्व केले. शरद पवारांच्या नेतृत्वाला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या विनंतीनंतर पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून शिंदे यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे हे अनुभवी, संघर्षशील आणि संघटनेतून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
Vijay Wadettiwar : शेतकरी, शिक्षक, बहिणी; महायुतीच्या सत्तेत कुणालाच न्याय नाही
प्रेरणादायी वाटचाल
शशिकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील मुळचे रहिवासी असलेल्या शिंदे यांनी 1999 साली प्रथमच निवडणूक लढवून जावळी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम करत असताना जलनीतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात भरीव कामगिरी केली. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आले. राजकीय संघर्षात सातत्याने सक्रिय राहणाऱ्या शिंदे यांना 2019 नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर ते विधान परिषदेवर निवडून आले. पक्षाच्या विधानपरिषद गटाचे प्रमुख प्रतोद म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वावर निष्ठा राखत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीवर भर दिला.
शशिकांत शिंदे यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये नव्या पिढीला संधी देण्याचा शरद पवारांचा संकल्प प्रकर्षाने स्पष्ट झाला आहे. शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाने संधी दिल्यास आर. आर. पाटील यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे जनतेसाठी निःस्वार्थ भावनेने काम करेन. बेरोजगारी, शेतकरी समस्या आणि युवावर्गाचे प्रश्न यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, सत्ता बदलांमुळे राजकीय दिशा बदलणाऱ्यांचा विसर पडतो. मात्र चळवळीतून आलेल्या आणि पवारसाहेबांच्या विचारांशी बांधिलकी जपणाऱ्यांना पक्षात मान मिळत राहील. शरद पवारांनी संघटनेचा पाया घडवून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास निर्माण केला. त्याच परंपरेचा पुढचा भाग म्हणून शिंदे हे नेतृत्व स्वीकारणार आहेत.
Yashomati Thakur : पहलगाम हल्ल्यात अनेकांचे जीव गेले, पण हल्लेखोर मोकाट?
योगदान अजरामर
जयंत पाटील यांच्या कार्यकाळात पक्षाने अनेक संघर्षांना सामोरे जाताना ठाम भूमिका घेतली. ते केवळ प्रदेशाध्यक्ष नव्हते तर पवारसाहेबांच्या विचारांचे सशक्त प्रतिनिधी होते. त्यांच्या कार्यशैलीची जागा घेणे कुणासाठीही सोपे नाही, हे शिंदे यांनी स्वतः मान्य केले. मात्र, एकजुटीने आणि विश्वासाने पुढे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचैतन्य निर्माण होईल, अशी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही अपेक्षा आहे. संघर्षातून आलेल्या या नेतृत्वाकडून नवे विचार, नवी दिशा आणि नव्या युगाचा आरंभ होईल, हे निश्चित आहे.