महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे गटावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यामागे केवळ राजकीय हेतू नसून, तुकडे तुकडे गँगप्रती असलेली सहवेदना आहे, असा थेट आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (उबाठा) पक्षावर केला. विधानसभेत हे विधेयक दोन दिवसांपूर्वी पारित झाल्यानंतर आता ते विधान परिषदेत सादर होणार असताना, उबाठा सेनेकडून विरोध सुरू झाला आहे. मात्र शेलार यांनी विरोध करणाऱ्यांची मते अप्रामाणिक असल्याचा ठपका ठेवत भाजपची भूमिका ठामपणे मांडली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा ढाचा अधिक बळकट करण्यासाठी आणि समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. कोणत्याही पक्ष, संघटना वा विचारधारेवर लक्ष ठेवून त्याची रचना झालेली नाही, हे स्पष्ट करताना शेलार यांनी विरोधी पक्षांवर दिशाभूल करण्याचा आरोप केला. लोकांमध्ये भीती पसरवून त्यातून राजकीय फायदा मिळविण्याची रणनीती रचली जात असल्याचा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
Nitin Gadkari : उपराजधानीतून केंद्रीय मंत्र्यांनी दिला तरुणांना ‘रोजगार मंत्र’
उपरोधिक टीका
विधान परिषदेमध्ये विधेयक चर्चेसाठी आले असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द का काढला नाही, असे लक्ष वेधून घेत शेलार यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकाचे स्पष्टीकरण देताना जनसुरक्षा कायदा कोणालाही जाचक ठरणार नाही, हे स्पष्ट केले होते. तरीही शिवसेना (उबाठा) व संजय राऊत यांनी याला विरोध केला. शेलार म्हणाले की, हेच लोक शरजिल उस्मानी, उमर खालिद यांसारख्या तुकडे गँगच्या विचारसरणीशी जवळीक ठेवतात. त्यांच्या प्रतिक्रियांमागे देशविघातक विचारधारांची काळजी आहे. जनतेच्या सुरक्षेच्या गोष्टी गौण ठरत आहेत. विरोधाच्या नावाखाली खोटे आणि फसवे मुद्दे निर्माण करून जनतेमध्ये गोंधळाचे वातावरण तयार करणे, हा त्यांचा खरा उद्देश आहे.
मराठी भाषा सक्तीच्या शासन निर्णयावरूनही शेलारांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील CBSE, ICSE, Cambridge आणि IB बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांच्या आत्ताच्या पिढीने तीन भाषा शिकाव्या लागल्या, अशी उपरोधिक टिप्पणी करत शेलार यांनी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे घराण्यावर विनोदी शैलीत टीका केली. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय सर्व शिक्षण संस्थांना लागू आहे. त्याच्या विरोधात जाणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. मराठीच्या मुद्द्यावरून जनभावना हातात घेत विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे काम शेलारांनी यावेळी केले.
Chandrapur : सहकार क्षेत्रात काँग्रेस-भाजप यांच्यात काट्याची टक्कर
राज ठाकरेंचे समर्थन
शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. यासंदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचे मनःपूर्वक आभार मानले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार आम्ही राज्यातील गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवरायांचा वारसा, शौर्य आणि पराक्रम जपण्यासाठी शासन बांधील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुर्गप्रेमी, शिवभक्त यांच्या भावना आणि मागण्या लक्षात घेऊन शासनाने गडकिल्ल्यांच्या अतिक्रमण मुक्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. अनेक ठिकाणी कारवाई सुरूही झाली आहे. केवळ 12 नव्हे तर सर्वच किल्ल्यांवर हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हाच सरकारचा खरा उद्देश असल्याचे शेलार यांनी ठामपणे सांगितले.