मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानमंडळात मंजूर झालेल्या विशेष जन सुरक्षा विधेयकाचे जोरदार समर्थन केले आहे. संविधानविरोधक शक्तींना रोखण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र विधिमंडळाने नुकतेच मंजूर केलेले विशेष जन सुरक्षा विधेयक हे देशातील संविधान न मानणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधेयकावर टिका करणाऱ्यांनी आधी त्याचा सखोल अभ्यास करावा. कारण ते केवळ संविधान विरोधकांवर कारवाईसाठीच नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची संरक्षण करण्यासाठीही महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, या विधेयकासाठी सर्व प्रकारच्या लोकशाही प्रक्रिया राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 25 सदस्यीय संयुक्त चिकित्सा समितीच्या शिफारसींचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांकडून आलेल्या 12 हजार सूचनाही गांभीर्याने घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही सभागृहांत सखोल चर्चा करून हे विधेयक मंजूर झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ujjwal Nikam : ज्यांनी कसाबला फाशी दिली, तेच आता संसदेत आवाज उठवणार
संविधानाच्या मर्यादेत कारवाई
नव्या कायद्यामध्ये कोणत्याही संघटनेवर थेट बंदी घालण्याऐवजी न्याय्य प्रक्रिया राबवण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. प्रस्तावित बंदीच्या आधी एक स्वतंत्र मंडळ नेमले जाईल. या मंडळापुढे ठोस पुरावे सादर करणे आवश्यक राहील. मंडळाचे समाधान झाल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. एवढेच नव्हे, तर संबंधित संघटनेस बंदीविरोधात 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे या कायद्यात कोठेही एकतर्फी निर्णय घेण्याची किंवा मनमानी कारवाईची शक्यता उरत नाही, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधेयकाचे सादरीकरण करताना सरकारने कुठलाही गुप्त अजेंडा ठेवलेला नाही. सर्वपक्षीय नेत्यांपुढे सर्व मुद्दे खुलेपणाने मांडण्यात आले होते. विविध पक्षांचे नेते, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यांचा विधेयकात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण पारदर्शकता आणि व्यापक सहमतीच्या आधारावर हा कायदा तयार केला असल्याची खात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Nitin Gadkari : शिक्षकांच्या नियुक्तीत पैसे दिल्याशिवाय काहीही शक्य नाही
निकम यांची नियुक्ती
देशहितासाठी मोठमोठ्या खटल्यात प्रभावी भूमिका बजावणारे, देशद्रोही आणि दहशतवाद्यांविरोधात लढणारे नामवंत विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याचा विशेष आनंद आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या कार्यामुळे अनेक देशद्रोह्यांना शिक्षा झाली आहे. न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी राष्ट्रपती महोदया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्वाची निवड करून संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
देशाच्या रक्षणासाठी सातत्याने न्यायालयीन लढाया देणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा खात्मा करणाऱ्या व्यक्तींना संसदेत स्थान देणे हे देशभक्तीची जाणीव ठसवणारे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उज्ज्वल निकम हे केवळ कायद्याचे जाणकार नाहीत, तर ते राष्ट्रहितासाठी झुंजणारे वीर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे संसदेत न्याय आणि राष्ट्रभक्ती या दोन्ही मूल्यांचे प्रतिनिधित्व होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.