महाराष्ट्र

Navneet Rana : भाषेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

Amaravati : राजकीय पोळी शेकणाऱ्यांवर नवनीत राणांचा हल्लाबोल

Author

भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील ऐक्याचा संदेश देत, भाषेच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

मी महाराष्ट्रात जन्मले, ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. मराठी माझी मातृभाषा नसली, तरी ती आत्म्याशी जुळलेली आहे, अशा शब्दांत माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषिक प्रवासाची आठवण करून दिली. मराठी भाषेचा आदर करताना, त्यांनी हिंदी भाषेला दुसऱ्या क्रमांकावरचा सन्मान मिळावा, अशी स्पष्ट भूमिका मांडली.

नवनीत राणा यांचा ठाम विश्वास आहे की, ज्या मातीत आपण राहतो, त्या राज्याची भाषा सर्वोच्च असते. मात्र, इतर भाषांनाही मान देणं हीच खरी सांस्कृतिक समजूत आहे. त्या म्हणाल्या की, मराठी शिकताना सुरुवातीला लोक हसले, टिंगल केली. पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न सोडला नाही. आजही त्या भाषेचा आदर करते. हे वक्तव्य करतानाच त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

Devendra Fadnavis : मोदी सरकारच्या तीन कायद्यांनी बदलणार खेळ

भाषेच्या नावावर राजकारण

भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना नवनीत राणा यांनी स्पष्ट केले की, काही नेते मराठी आणि हिंदी भाषिक समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी-हिंदी भाषेच्या विषयावर जाणीवपूर्वक वातावरण तापवत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यांची मुले कोणत्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत, हे पाहिले तर त्यांचे खरे हेतू स्पष्ट होतात. या टीकेमागे नवनीत राणा यांचा उद्देश भाषिक सौहार्द जपण्याचा आणि अमरावतीतील सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा होता. त्यांनी भाषेच्या आडुन निर्माण होणाऱ्या राजकीय फायद्यांच्या विरोधात जनतेला जागरूक राहण्याचं आवाहन केलं.

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झपाट्याने झालेल्या विकासकामांचा विशेष उल्लेख केला. अनेक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे. अमरावती शहरातही लवकरच मेट्रो धावेल. मात्र, या विकासाच्या मुद्द्यांवर न बोलता काही नेते सतत टीकेचं राजकारण करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याकडे वाटचाल होत असताना भाषेच्या नावावर राजकारण केलं जातंय, ही चिंतेची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

Devendra Fadnavis : देशविघातक शक्तींना आता कायद्याने लगाम

महापालिका निवडणुकीसाठी निर्धार 

नवनीत राणा यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती अमरावती जिल्ह्यात महत्त्वाची ठरली. आता महापालिकेच्या निवडणुकीतही ही युती अधिक बळकट होणार आहे. भगवा झेंडा महापालिकेवर फडकवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच विजय मिळवण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणाच्या अखेरीस नवनीत राणा यांनी हिंदुस्थान हा आपला धर्म असल्याचे सांगत, कोणत्याही समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले. कोणत्याही राजकीय फायद्यासाठी धर्म किंवा भाषा या गोष्टींचा वापर होऊ नये, हीच त्यांची अपेक्षा होती. समाज एकसंघ राहिला, तरच राष्ट्र अधिक बळकट होईल, हा त्यांचा स्पष्ट संदेश होता.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!