विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या विशिष्ट शैलीत राजकारणात हलकल्लोळ माजवला आहे. शनिवारी नागपूरमध्ये शिक्षक आणि प्राचार्यांशी संवाद साधताना त्यांनी अशा शब्दांत सत्तेच्या अहंकारी वृत्तीवर थेट प्रहार केला की, उपस्थित श्रोते तर अंतर्मुख झालेच, पण संपूर्ण राज्यात या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली. गडकरींच्या वक्तृत्वात जितका अनुभव आहे, तितकाच थेटपणा आणि प्रामाणिक आत्मा जाणवतो.
गडकरी म्हणाले, सत्ता, संपत्ती, पैसा, ज्ञान आणि सौंदर्य मिळाल्यावर लोक गर्विष्ठ होतात. मी सर्वात बुद्धिमान आहे, मी साहेब झालो आहे, मी दुसऱ्याला गिनतच नाही, अशा वृत्तीमुळे माणसाचा अहंकार वाढतो. त्यांच्या या विधानाने अनेक नेत्यांच्या वर्तनशैलीवर अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले गेले. ते पुढे म्हणाले, स्वत:ला लादून कोणीही महान होऊ शकत नाही. इतिहासात पाहा, जे खरे महान ठरले ते लोकांच्या कृतीने, स्वभावाने मोठे झाले. त्यांनी स्वतःला कधीही लादलं नाही. हे बोलताना त्यांच्या स्वरात स्पष्टता होती, पण त्यामागे चिंतेचा सूरही स्पष्ट जाणवत होता.
ठणकावून सांगितले
आपण आपल्या हाताखालच्या कनिष्ठांशी कसे वागतो, हेच नेतृत्वाचे खरे मोजमाप आहे, असं गडकरी यांनी ठामपणे सांगितलं. सन्मान मागून मिळत नाही, तो तुमच्या कर्मावरून मिळतो, असं ठणकावून सांगत त्यांनी नेतृत्वाच्या खऱ्या मूल्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या या भाषणामुळे सत्तेच्या मग्रूर मानसिकतेवर आरसा दाखवला गेला आहे, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
गडकरी यांनी यावेळी नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळ्यावरही रोखठोक भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, अनेक शिक्षकांची नियुक्ती ही लाच देऊन झाली आहे. पण आवाज उठवला गेला नाही. त्यांच्या या विधानामुळे सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. ही टीका केवळ भ्रष्टाचाराविरोधात नव्हे, तर व्यवस्थेतील नैतिक अध:पतनावरही थेट बोट ठेवणारी होती.
या सर्व विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, माजी मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, गडकरी हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कानपिचक्या देत आहेत. त्यांचा रोख पक्षातल्या काही ‘मीपणा’ घेऊन वावरणाऱ्या नेत्यांवर आहे. त्यांच्या मते, हे वक्तव्य म्हणजे केवळ भाषण नव्हे, तर एक अंतर्मुख करणारी ‘चेतावणी’ आहे.
गडकरी यांच्या भाषणातील शब्द हे केवळ टीका करण्यापुरते मर्यादित नाहीत. ते म्हणजे एक आत्मपरीक्षणाचा आरसा आहे , सत्ताधाऱ्यांसाठीही, आणि जनतेसाठीही. ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखला जाणारा हा नेता केवळ रस्ते आणि पूल उभारण्यातच यशस्वी नाही, तर सामाजिक आणि राजकीय मूल्यांचं बांधकाम करतानाही तेवढाच थेट आणि स्पष्ट आहे. त्यामुळेच त्यांच्या भाषणाची चर्चा केवळ वादापुरती मर्यादित राहत नाही, तर ती विचारांना दिशा देणारी ठरते.