महाराष्ट्र

BJP : संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवर हल्ला; भाजपच्या रक्तात नाही.. 

Chandrashekhar Bawankule : गायकवाड यांच्यावर काळं फासलं अन् राजकारण तापलं

Author

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करत काळं फासण्यात आलं आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे.

अक्कलकोटच्या शांत परिसरात 13 जुलै रविवारी एक धक्का देणारी घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावर काळं फासण्यात आलं. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भरचौकात गायकवाड यांना त्यांच्या गाडीतून खेचत बाहेर काढलं. त्यानंतर आक्रमकतेने त्यांच्यावर काळं फासलं. या घटनेनं केवळ अक्कलकोट नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवली आहे.

या हल्ल्याची राजकीय धग आता प्रचंड प्रमाणात तापली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट भाजपवर गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा “रेकॉर्डवरील गुन्हेगार” असून, तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. इतकंच नव्हे तर, तो भाजपा नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अंधारेंच्या या विधानामुळे भाजपच अडचणीत सापडली आहे.

खालच्या पातळीचे कृत्य 

अंधारे यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधून स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. अंधारेंच्या आरोपांना फेटाळत त्यांनी जोरदार प्रतिवाद केला. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही. भाजपच्या रक्तात अशा खालच्या स्तरावरील कृत्यांची परंपरा नाही. संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना, असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितलं.

बावनकुळे यांनी सुषमा अंधारेंवरही निशाणा साधत म्हटलं की, नेते आणि कार्यकर्ते अनेकदा फोटोसाठी एकत्र येतात. त्यामुळे कोणाचा फोटो कुणासोबत आहे, यावरून नातं जोडणं चुकीचं आहे. बानगुडे पुढे म्हणाले की, दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता असेल, पण कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत चौकशी करावी, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही.

Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?

सत्ताधाऱ्यांवर प्रहार 

या घटनेनंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या असून, गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपविरोधकांनी संधी साधत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने विचारधारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विरोधक भाजपला ‘राजकीय गुन्हेगारीला खतपाणी घालणारा पक्ष’ म्हणून टार्गेट करत आहेत. हा आरोप भाजपसाठी आगामी राजकीय वातावरणात एक मोठं डाग ठरू शकतो.

पोलिस तपास, आरोप-प्रत्यारोप आणि सामाजिक संताप यामध्ये आता खरी कसोटी आहे ती सत्य काय आहे हे शोधण्याची. पण एक गोष्ट निश्चित की, प्रविण गायकवाड यांच्यावरचा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर विचारस्वातंत्र्यावर आणि त्या पार्श्वभूमीवर राजकारण किती घाणेरडं आणि व्यक्तिविरोधी होतंय, याचा तो आरसा ठरत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!