कासारखेडमध्ये संजय राठोडांनी विकास आणि विरासत यांचा समतोल साधत समाजाला आत्मसन्मानाचा नवा संदेश दिला. श्रद्धेच्या पायावर उभा राहिलेला हा कार्यक्रम ठरला नवचैतन्याचा प्रेरणास्थान.
अकोल्यातील कासारखेड या छोट्याशा पण ऐतिहासिक पाऊलवाटांवर चालणाऱ्या गावाने नुकताच एका विलक्षण दृश्याचा साक्षीदार होण्याचा मान पटकावला. गावातील वातावरण भारलेलं, डोळ्यांत अभिमान, शब्दांत ओलावा आणि मनगटात विकासाची उमेद होती, कारण उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड.
समाजाचा विकास आणि विरासत हेच माझं ध्येय आहे, असं ठामपणे सांगणाऱ्या राठोड यांनी आपल्या कार्यातून समाजासाठी नवा प्रकाशवाट उघडण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निमित्त होतं बंजारा समाजाचे श्रद्धास्थान व हरित क्रांतीचे शिल्पकार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. मात्र, हा केवळ एक पारंपरिक स्मरण सोहळा नव्हता, हा होता नवसंस्कार आणि नवा संकल्प जागवण्याचा क्षण.
संघर्षाचं शस्त्र
संजय राठोड यांनी नुसती गौरवगाथा मांडली नाही, तर विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत समाजाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला. केवळ मंदिर बांधल्याने प्रश्न सुटतील का? असा प्रश्न विचारला जातो. पण मी सांगतो, आत्मसन्मानाचा मंदीर हेच संघर्षाचं शस्त्र असतं, अशा दमदार शब्दांत त्यांनी आपल्या विरोधकांनाही सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
राठोड पुढे म्हणाले, आजवर बंजारा समाजाचे 19 महत्त्वाचे प्रश्न मी मार्गी लावले आहेत आणि उर्वरितही निश्चित सोडवणार आहे. टीका करण्यापेक्षा कृतीतून विश्वास निर्माण करणं हेच माझं ब्रीद आहे. समाजाचं स्थान, त्यांची सांस्कृतिक ओळख आणि आत्मसन्मान जपणं ही माझी प्राथमिकता आहे. या कार्यक्रमादरम्यान गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सभामंडपाचं लोकार्पण आणि जलसंधारण विभागाच्या अंतर्गत नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पांमुळे परिसरातील पाणी साठवणूक, शेतीच्या सिंचनाची क्षमता आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित ग्रामस्थांनी संजय राठोड यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास आणि उत्साह पाहून हे निश्चित झालं की, विकासाची ही मशाल आता अधिक उजळणार आहे. संजय राठोड हे केवळ एक मंत्री नाहीत, तर संघर्ष, संस्कृती आणि समाजहित यांचा समन्वय साधणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या कार्यातून आणि विचारातून समाजाला आत्मभान मिळतंय, आणि भविष्यातही बंजारा समाजाच्या नवचैतन्याला दिशा मिळत राहणार यात शंका नाही.