पुणे माझं माहेर, आणि देवेंद्रजींचं लाडकं मूल, असं म्हणत अमृता फडणवीसांनी पुण्याशी असलेलं खास नातं उघड केलं. शहराच्या समस्या, विकास आणि महिलांवरील भूमिका स्पष्टपणे मांडली.
माझी आजी पुण्यात राहते, मी जेव्हा पुण्यात येते तेव्हा मला वाटतं की मी माहेरी आले आहे. पण हे फक्त माझं माहेर नाही, तर देवेंद्रजींसाठी हे शहर म्हणजे त्यांचं ‘बेबी’ आहे. अमृता फडणवीस यांच्या या ओळींनी उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि राजकीय चर्चेला एक नवा रंग दिला. पुण्यात एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत पुण्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिलखुलासपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘शहरप्रेमा’चा पट मांडला.
मी देवेंद्रजींना इथल्या समस्या सांगते की, रस्त्यांचं काय, वाहतुकीचं काय, मला दिसतं आणि मी सांगतेही. पण मला आनंद आहे की त्यांचं लक्ष आधीपासूनच पुण्याकडे आहे. ते शहराला आपलं मूल मानतात, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आणि एका क्षणात पुणेकरांमध्ये आपुलकीची लाट उसळली. या भाषणानंतर माध्यम प्रतिनिधींनी विचारले की, पुण्याकडे एवढं लक्ष का? यावर अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर देखील तितकंच प्रभावी होतं. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरं देवेंद्रजींसाठी स्वतःची मुलं आहेत. पुणं त्यांचं खास बाळ आहे.
नक्कीच फरक पडतोय
शहरातल्या झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणामुळे काही मूलभूत गोष्टींकडे अद्याप लक्ष गेलेलं नाही, याची जाणीव त्यांनी भाषणातून करून दिली. रस्ते अजून व्यवस्थित पाहिजेत, वाहतूक नियोजन सुधारायला हवं. मेट्रोने नक्कीच फरक पडतोय. पण जोपर्यंत सामान्य पुणेकरांचं आयुष्य सुसह्य होत नाही, तोपर्यंत देवेंद्रजी पुण्याच्या फेऱ्या कमी करणार नाहीत, असं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं.
महिलांच्या सन्मानाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतानाच, राज्यातील महिला अत्याचारांबाबत अमृता फडणवीस यांनी स्पष्ट आणि संवेदनशील भूमिका मांडली. “महिला आधुनिक होत असताना आजही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. न्यायव्यवस्था आणि पोलीस व्यवस्था काम करत आहेत, पण प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण आपल्या घरी स्त्रियांचा सन्मान करतो का, हे मुलांना शिकवतो का, हे जास्त महत्त्वाचं, अशा शब्दांत त्यांनी समाजाला आरसा दाखवला.
ठाम विश्वास
‘लाडकी बहीण योजना’बाबत विश्वासही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचं ठाम सांगितलं. फक्त अपात्र बहिणींना वगळण्यात आलं आहे. सरकारकडून आर्थिक ताण असला तरीही ही योजना सुरू ठेवण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला. या एका भाषणातून अमृता फडणवीस यांनी पुण्याचं स्थान केवळ त्यांच्या वैयक्तिक भावना किंवा नातेसंबंधातच नाही, तर सरकारच्या कामकाजात, धोरणात आणि दृष्टीकोनातही किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलं. त्यांच्या एका विधानानं पुणे आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.