अकोल्यातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यावरील शारीरिक छळाच्या गंभीर आरोपावरून आमदार नितीन देशमुख यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
राज्यात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पण एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी अधिवेशनाला पाठ फिरवत थेट अकोल्यात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. मूर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात एका कंत्राटी महिला कॉम्प्युटर ऑपरेटरकडून कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आरोप असलेले अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी डी.बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असून या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केली आहे. गेले दोन तासांपासून नितीन देशमुख यांनी प्राधिकरणाच्या अकोला कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं आहे आणि प्रशासनावर थेट दबाव निर्माण केला आहे.
Maharashtra Politics : नेते बोलतात उत्साहात, पक्ष अडकतो बचावात
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन देशमुखांनी हे प्रकरण विधिमंडळात ‘लक्षवेधी’ म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभेचे अध्यक्षच “मॅनेज” झाल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. आरोपी अधिकारीच सांगत आहेत की आमचं वरून सेटिंग झालंय, म्हणजे अध्यक्षच मॅनेज झालेत. त्यामुळेच मी आज अधिवेशनाला हजर न राहता या बहिणीसाठी रस्त्यावर उतरलो आहे, असे धगधगते विधान करत त्यांनी राजकीय व्यवस्थेवर थेट बोट ठेवलं. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, केवळ निलंबन पुरेसं नाही, या अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे.
पीडित महिलेनेही धाडस दाखवत आपली बाजू मांडली असून तिने स्पष्टपणे म्हटलं की, कपिले यांच्यावर मी वेळोवेळी तक्रारी केल्या, पण काहीच झालं नाही. कारण त्यांच्या मागे मुर्तिजापूर मतदारसंघाच्या आमदारांचं पाठबळ आहे. तक्रारींच्या फाईल्स हरवतात, कुठेच पोहोचत नाहीत. पैशांच्या आणि दबावाच्या जोरावर न्याय दाबला जातोय. हे विधान प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणेला ठोस आरसा दाखवणारं आहे.
आमदार नितीन देशमुख यांनी या प्रकरणात संपूर्ण यंत्रणा, वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पाठबळ असलेल्या आरोपींविरोधात खुलेपणाने आवाज उठवला आहे. अधिवेशनापेक्षा एका पिडीत महिलेचा संघर्ष महत्त्वाचा मानत त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून यंत्रणेला हादरवण्याचा प्रयत्न केला आहे. अकोल्याच्या रस्त्यावर सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या आंदोलनामुळे आरोपींवर कारवाई होईल की पुन्हा एकदा राजकीय पाठबळामुळे गुन्हेगार मोकाट राहतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.