गुन्हेगारीला चाप बसविण्यासाठी, ट्रॅफिकच्या गोंधळाला शिस्त लावण्यासाठी नागपूर पोलीस विभाग सज्ज झाले आहे. पोलीस विभाग स्वतः रस्त्यावर उतरून जो नियम तोडेल त्याला धडा शिकविणार आणि जो गुन्हा करेल त्याला शिक्षा मिळणार, असा संदेश देत आहेत.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवा भाऊंच्या गडावर, नागपूरच्या रस्त्यांवर, गल्लीपासून प्रभागापर्यंत एक नवा शिस्तीचा महायज्ञ सुरू झाला आहे. जणू पोलिसांनी ‘शहरात शिस्तीचा सूर्य उगम पावावा’ असं संकल्पविधान केल्याप्रमाणे, संपूर्ण पोलीस विभाग युद्धपातळीवर मैदानात उतरला आहे. ‘ऑपरेशन थंडर’चा कडकडाट आणि ‘ऑपरेशन यु टर्न’ची धार नागपूरच्या जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत आहे.
दिवस असो वा रात्र, गुन्हेगारी असो वा ट्राफिक, पोलीस दलाने रणशिंग फुंकले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात नागपूर पोलिसांनी शिस्तीची नवी परिभाषा लिहायला सुरुवात केली आहे. एखादं ‘कमांड सेंटर’ जसं युद्धाच्या वेळेस कार्यरत असतं, तसंच काहीसं चित्र सध्या नागपूर पोलिसांचं आहे. डीसीपी, एसीपी, पीआय, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अगदी पोलिस आयुक्त स्वतः, सगळे अधिकारी थेट रस्त्यावर उतरून काम करत आहे. ही केवळ कारवाई नाही, तर नागपूरच्या ‘फ्युचर मॅनेजमेंट’ची झलक आहे.
गुन्हेगारांचं काळं स्वप्न संपणार
गुन्हेगारीचा फणकारा दडपण्यासाठी ‘ऑपरेशन थंडर’ म्हणजे अगदी आंधळी वारे घेऊन आलेला वादळ. हे ऑपरेशन केवळ छाप्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यामागे एक ठोस नियोजन, माहितीवर आधारित गनिमी कावा आणि गुन्हेगारीच्या मुळावर प्रहार करण्याचा संकल्प आहे. पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर, ड्रग्स नेटवर्कवर, बेकायदेशीर धंद्यांवर धडक दिली आहे. ठिकठिकाणी कारवाया, रात्रभर चालणाऱ्या रेड आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं, या सगळ्याचा धडाका शहरात जाणवतोय.
गुन्हेगारीवरची चाप तर झालीच, पण नागपूरच्या वाहतुकीची शिस्त म्हणजे पोलीस विभागाने घेतलेली सर्वात मोठी जबाबदारी. नवीन रुजू झालेले डीसीपी आयपीएस लोहित मतानी यांनी यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून ट्रॅफिक नियंत्रणात आणायला सुरुवात केली आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह केल्याने अनेकांवर धडाक्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं ‘ऑन फील्ड’ नेतृत्व, खडखडीत दंडात्मक कारवाया, चुकीच्या वळणावर उभं राहून दिलेला ‘यु टर्न’चा इशारा. यामुळे ट्राफिकच्या मैदानात एक नवा ‘ऑर्डर’ निर्माण होतोय.
Lohit Matani : ट्रॅफिकची पाठशाळा अन् शिस्तीच्या शिक्षकांचं ऑपरेशन ‘यु टर्न’
ॲक्शन मोडवर खाकीमधील सेनापती
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या गावी जर पोलीस व्यवस्थेची ही झंझावाती सुरुवात होत असेल, तर याचा अर्थ स्पष्ट आहे, नागपूर हे केवळ विदर्भाचं नव्हे, तर राज्यासाठी आदर्श मॉडेल बनवण्याचा शासनाचा संकल्प आहे. अद्वितीय गोष्ट म्हणजे फक्त पायऱ्या चढून आदेश देणारे अधिकाऱ्यांचे दिवस आता गेले आहेत. नागपूरात सध्या सर्वच पोलीस अधिकारी एकाच वेळी मैदानात आहेत. हे शहर सध्या पोलीस दलाच्या ‘एकजुट’ आणि ‘ऍक्शन’ यांचा आदर्श नमुना बनत आहे. साहजिकच जनतेमध्ये एक नवा विश्वास निर्माण झाला आहे की, शिस्त म्हणजे फक्त भिती नव्हे, ती सुरक्षिततेची हमी आहे.
या सर्व घडामोडींमध्ये सर्वात मोठा मुद्दा हा आहे की नागपूर हे आता फक्त गृहमंत्र्यांचं गाव उरलेलं नाही, तर राज्यासाठी ‘कायदा व सुव्यवस्थेचं प्रगत मॉडेल’ बनण्याच्या मार्गावर आहे. इथली प्रत्येक मोहिम, प्रत्येक कारवाई, प्रत्येक यश हे महाराष्ट्राच्या इतर शहरांनाही प्रेरणा देत आहे. हा लढा गुन्हेगारीविरुद्धचा आहे, वाहतूक गोंधळाविरुद्धचा आहे. पण यापेक्षा मोठा आहे तो शिस्तीच्या संस्कृतीचा प्रचार करणारा आहे. हे केवळ कारवायांचे फोटो, मीडियाचे रिपोर्ट्स किंवा ड्रोन फुटेज नव्हे, हे आहे नागपूरच्या रस्त्यावर उभं राहून ‘शासन चालवणाऱ्या पोलिसांचं’ नवसंस्कार.