विधानभवनात पुन्हा एकदा गोंधळाचा भडका उडाला आणि सभागृह राजकारणाच्या अखाड्यात रूपांतरित झालं. आदित्य ठाकरेंच्या चड्डी बनियान गँग या उपमेने सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात करत चर्चेचं वादळ पेटवलं.
मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात विधानसभेचे सभागृह चांगलेच तापले. प्रश्नोत्तराच्या तासात झालेला वाद इतका तीव्र होता की, सभागृहातील वातावरणच चिघळून आले. यावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे वातावरण अधिकच ताणले गेले.
सर्व आमदार आपापल्या जागा सोडून उभे राहिल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सभापतींनी शांततेचे आवाहन केले, मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गोंधळ इतका वाढला की, अखेर काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले. या सगळ्या गदारोळानंतर विरोधकांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
बोचरी टीका
उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे गटावर रोखठोक टीका करत ‘चड्डी बनियन गँग’, अशी विशेषणं वापरली आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. ते म्हणाले, एकीकडे चड्डी बनियान गॅंग धक्का मुक्की करते आणि दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास तयार नाहीत. हे विधानभवन काय मजा मस्तीसाठी आहे का? असा बोचरा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या विधानावरून सभागृहातील असंतोष आणि सत्ताधाऱ्यांचा वागताना असलेला उद्दामपणा अधोरेखित झाला.
मुंबईतील संरक्षण खात्याच्या मालकीच्या भूखंडावर वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मुद्दा या गदारोळाचं प्रमुख कारण ठरला. आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, केंद्र सरकारची ही जमीन असल्यामुळे अनेक वर्षे काम अडकलेले आहे. कधी डिफेन्सचा, तर कधी रेल्वेचा विरोध असतो. त्यांनी या प्रश्नाकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. गेल्या चार टर्मपासून काही आमदार आहेत, पण हा प्रश्न सुटलेलाच नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ठाकरेंचा आरोप
या विषयावर सरकारकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे विरोधकांचा संताप आणखी वाढला. मंत्री महोदयांकडून कोणतेही ठोस उत्तर आले नाही. आम्ही आमदार आहोत, आमचे प्रश्न ऐकले पाहिजेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारही प्रश्न विचारतात पण त्यांनाही उत्तर मिळत नाही, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या मस्तीचा उल्लेख करत ती लोकशाहीची थट्टा असल्याचं सांगितलं.
चड्डी बनियन गँग या शब्दप्रयोगाने आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या वर्तनावर मार्मिक टोला लगावला. त्यांच्या या उपमेचा अर्थ केवळ विडंबन नसून, सत्तेच्या मदांधपणाला दिलेला तडाखा होता. सभागृहातील धक्का मुक्की, गोंधळ आणि जनतेच्या प्रश्नांपासून झालेलं दूरत्व हेच त्यामागचं मूलभूत सत्य आहे.
संपूर्ण गदारोळ आणि प्रश्नांना मिळालेला वाऱ्यावरचा पाढा पाहता, जनतेच्या मनात आता एकच प्रश्न घोंगावत आहे, हे अधिवेशन जनतेच्या हितासाठी आहे की सत्ताधाऱ्यांच्या अहंकाराच्या नाट्यरूप प्रदर्शनासाठी? कारण जबाबदारी झाकोळून “मस्तीचे मुखवटे” लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि उत्तर मात्र कुठेच दिसत नाही.