राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांनी अधिकृत घोषणा करत पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदल घडला असून शरद पवार गटाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खुद्द शरद पवार यांनी या नव्या नेतृत्वाची घोषणा केली असून पक्ष संघटनात्मक परिवर्तनाच्या दिशेने पुढे सरसावत असल्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला होता. सुरुवातीला त्यांनी पद सोडण्याचे नाकारले असले तरी अचानक राजीनाम्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
संघर्षाचा काळ
राजीनाम्याच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांनी हा केवळ एका टप्प्याचा शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे स्पष्ट केले. नवीन नेतृत्वास आपला पूर्ण पाठिंबा असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले. राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘मी जातोय पण सोडत नाहीये’ या शब्दांत आपली राजकीय सक्रियता जपण्याचा इशारा दिला. जयंत पाटील यांची सात वर्षांची कालावधी पक्षासाठी अनेक आव्हानांनी भरलेली होती. 2018 साली प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत पक्ष संघटनेला बळकटी दिली. पक्षात असलेल्या आंतरिक असंतोष आणि राजकीय पेचप्रसंगात त्यांनी संघटन टिकवण्याचा प्रयत्न केला.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. फक्त चार जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. तरीही जयंत पाटील यांनी संयम न गमावता नव्या रणनीतीसह पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या दिशेने नेले. शिवस्वराज्य यात्रा, पूरग्रस्त भागातील मदतकार्य, विविध कार्यकर्त्यांशी थेट संवाद अशा उपक्रमांमुळे त्यांनी पक्षातील चैतन्य टिकवले. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत 54 जागा जिंकून पक्षाला मोठे यश मिळाले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील यांना जलसंपदा मंत्रिपद मिळाले. त्यांनी मंत्रिपदावर असताना विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले.
जनतेशी थेट संपर्क
पक्षाशी जनतेचा थेट संवाद साधण्यासाठी ‘राष्ट्रवादी अभिप्राय’, ‘परिवार संवाद यात्रा’, ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ असे उपक्रम सुरू केले. यामध्ये लाखो कार्यकर्त्यांचा सहभाग मिळवून त्यांनी संघटनात्मक संपर्क मजबूत केला. शेतकरी आंदोलन, स्वाभिमान सभा, निष्ठावंत दौरे, ‘टू द पॉईंट’ पॉडकास्ट यासारख्या उपक्रमांनी त्यांनी पक्षाचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवला. लोकसभेतील मोठ्या विजयांपासून विधानसभेतील आव्हानांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर जयंत पाटील यांनी नेतृत्वाचा मजबूत धागा पकडला. मात्र नवीन नेतृत्व आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संयमानं बाजूला होण्याचा निर्णय घेतला.