भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार झाला आहे. महायुतीच्या सहकार पॅनलनं 21 जागांवर उमेदवारी जाहीर करत सत्तेच्या शिखरासाठी शिंगं पुकारली आहेत.
भंडाऱ्याच्या सहकारविश्वात सध्या एक वेगळीच ऊब आहे. आषाढ संपतोय, पण खऱ्या वीजा आणि वादळांचं गडगडाट मतपेटीतून होणार आहे. कारण 27 जुलै रोजी होणाऱ्या भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ‘सहकार पॅनल’ने आपला दमदार सेनापतीनिशी मोर्चा उघडला आहे. महायुतीतील तीन तगडे पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी हातात हात घालून बँकेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे.
हॉटेल व्हीके येथे 15 जुलै मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी या प्रबळ उमेदवारांची घोषणा करत मतदारांवर एकप्रकारे सत्तेचा ‘नंबर गेम’ उघड केला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते आणि सहकार क्षेत्रातील तगडे चेहरे उपस्थित होते. हे जणू या रणसंग्रामाचे युद्धनायक ठरले आहेत.
शेतकऱ्यांची बँक
राजेंद्र जैन यांनी ठामपणे सांगितले की, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. परिणय फुके आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एकसंघ लढण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार पॅनलमधून दिलेले उमेदवार अनुभव, कामगिरी आणि विकासाचं प्रतीक आहेत. सुनिल फुंडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची गती आणि प्रगती दोन्ही वाढली आहे. शेतकऱ्यांना कर्जवाटप, बँकिंग सुधारणा, शाखा विस्तार अशा विविध आघाड्यांवर बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे ही बँक आता ‘शेतकऱ्यांची बँक’ म्हणून ओळखली जाते.
सहकार पॅनलचे उमेदवार म्हणजे पक्ष, सामाजिक प्रतिनिधित्व आणि कार्यक्षमतेचं प्रतीक. त्यात कैलास नशिने, धर्मराव भलावी, सुनिल फुंडे, प्रकाश मालगावे, प्रशांत पवार, प्रदीप पडोळे, संदीप फुंडे, चेतक डोंगरे, योगेश हेडाऊ, आशा गायधने, तिरा तुमसरे, नाना पंचबुद्धे, कवलजितसिंग चढ्ढा, विश्वनाथ कारेमोरे, होमराज कापगते, रामदयाल पारधी, अनिल सार्वे, सदानंद बुरडे, जितेश इखार, धर्मेंद्र बोरकर आणि श्रीकांत वैरागडे यांचा समावेश आहे.
Sudhir Mungantiwar : गरिबांच्या पुंजीसाठी आमदार विधानसभेत सरसावले
रंगतदार लढत
दुसऱ्या बाजूला, अनेक अपक्ष व इतर गटांचे उमेदवार देखील रिंगणात आहेत. त्यामध्ये चंद्रदिन आराम, अजय मोहनकर, अरविंद आसई, शशिकिशोर बांडेबुचे, धनंजय तिरपुडे, सविता ब्राम्हणकर, शशांत जोशी, प्रदीप बुराडे, मोहित मोहरकर, अशोक चोले यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र सहकार पॅनलच्या ताकदीसमोर त्यांचं पारडं सध्या तरी हलकं वाटतं आहे.
सात तालुक्यांतील सभासदांनी कोणाच्या बाजूने कौल द्यायचा याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की, सहकार पॅनलचे उमेदवार एका मजबूत यंत्रणेचं, विकासाच्या प्रामाणिक हेतूचं आणि शेतकरीहिताच्या अजेंड्याचं प्रतिनिधित्व करतात. महायुतीच्या सहकार पॅनलने या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मोर्चेबांधणी केली आहे. प्रत्येक तालुक्याचा मारा, प्रत्येक मतदाराचा स्पर्श, आणि प्रत्येक मताचं सोनं करण्याची ही संधी! २७ जुलैला भंडाऱ्यातील सहकार रणभूमीत कोणाचा विजय होईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.