पूर्व विदर्भातील पूरग्रस्त कारधा पुलाच्या प्रश्नावर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. प्रशासनाकडून ड्रोन सर्वे करून पुनर्वसन प्रक्रियेला मंजुरी मिळाली आहे.
सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. वाहतूक मार्ग ठप्प झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्व विदर्भात सलग दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने घरसामान, पिकं आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावागावांमध्ये रस्ते बंद असून अनेकांना आपापल्या घरातूनही बाहेर पडता येत नाही.
शेतकऱ्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या हंगामी शेतीच्या आशांवर पावसाने अक्षरशः पाणी फेरले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेला ‘कारधा पूल’ संपूर्ण पाण्याखाली गेला. परिणामी, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिक अडकल्याचे चित्र निर्माण झाले. ही गंभीर समस्या लक्षात घेत, भूतपूर्व मंत्री आणि विदर्भाचे निष्ठावान नेतृत्व करणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आहे. जनतेच्या वेदनांना शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी डॉ. फुके यांनी आवाज उठवत ‘कारधा आंदोलन’ छेडले. त्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात एक सकारात्मक लाट पसरली.
खऱ्या नेतृत्वाचा दाखला
डॉ. फुके यांनी जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधत कारधा परिसराचा ड्रोन सर्वेक्षण करण्याची मागणी केली. हा निर्णय केवळ तातडीचा नव्हता, तर दूरगामी परिणाम घडवणारा होता. ड्रोन सर्वेक्षणानंतर प्रशासनाकडून आलेला अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आहे. येत्या सात दिवसांत तो मंत्रालयात सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे लवकरच कारधा पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होणार आहे, असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला आहे. ही केवळ यशाची सुरुवात आहे. कारधा पुनर्बांधणीच्या दिशेने आमचं पाऊल पुढे पडलं आहे, असं त्यांनी म्हटले आहे. या आंदोलनात केवळ राजकीय पुढारीच नाही, तर स्थानिक महिला नेतृत्त्वही सक्रिय होतं.
Parinay Fuke : अंधारमय महाज्योतीच्या भविष्याला आमदारांनी दिला आशेचा किरण
मंजुषाताई गजबे आणि ग्रामपंचायत सदस्या नर्मदाताई मेश्राम यांनी या आंदोलनात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. त्यांचे धैर्य आणि नेतृत्व ही यशाची एक महत्त्वाची चावी ठरली आहे. संपूर्ण कारधा ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी केला.पूर ओसरताच डॉ. फुके यांनी गावातील बेघर झालेल्या नागरिकांची तातडीने व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. मौजा गिरोला येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात टिनाच्या शेडचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही मदत केवळ औपचारिक नसून, संकटात अडकलेल्या जनतेसाठी एक दिलासा देणारी आहे.पूर्व विदर्भाच्या विकासासाठी सदैव आघाडीवर असलेले डॉ. परिणय फुके हे फक्त राजकारणी नाहीत, तर जनतेच्या भावनांचा आवाज आहेत. कारधा आंदोलनातून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, ते केवळ निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत, तर संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे खरे नेते आहेत.