महाराष्ट्र

Abhijit Wanjarri : शिक्षक भरतीतील तांत्रिक अडचणींचा आमदारांनी केला भांडाफोड

Monsoon Session : पवित्र प्रक्रियेत अपवित्र त्रुटी

Author

नागपूरचे आमदार अभिजीत वंजारी यांनी महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पवित्र पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींवर विधान परिषदेत गंभीर टीका केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून ‘शालार्थ शिक्षक घोटाळा’ ही एक सतत चर्चेत असलेली आणि जनतेच्या मनात खदखद निर्माण करणारी घटना बनली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये रंगलेली लढत आणखी तीव्र झाली आहे. अधिवेशन शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपले असताना, विरोधी आमदारांनी शिक्षण क्षेत्रातील अपयशांवर ठाम भूमिका घेऊन सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विशेषतः नागपूरचे आमदार अभिजीत वंजारी यांनी शिक्षण विभागाच्या ‘पवित्र पोर्टल’ मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेतील त्रुटींवर जोरदार आवाज उठवला आहे.

वंजारी यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना सादर करताना भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्यतेचा अभाव असल्याचे नमूद केले. आमदार वंजारी म्हणाले की, शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणारे पवित्र पोर्टल हे तांत्रिक दृष्ट्या कुचकामी ठरत आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. यामुळे अनेक पात्र उमेदवार भरती प्रक्रियेबाहेर फेकले जात आहेत. काही उमेदवारांना वारंवार त्रुटींच्या कारणास्तव अपात्र ठरवले जाते. तर काही ठिकाणी नियुक्त्यांमध्ये अनावश्यक विलंब होतो. परिणामी, राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई वाढत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

Ashish Jaiswal : ‘समतोल’ विसरलात तर विकासाचे गणित शून्य होईल

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

वंजारी पुढे म्हणाले की, स्थानिक गरजांचा विचार करून आणि शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य देऊन नियुक्त्या केल्या पाहिजेत. राज्यभरातील उमेदवार या पोर्टलवर अवलंबून असताना, त्यांना सुस्पष्ट आणि सुलभ मार्गदर्शनाची गरज आहे. सध्या त्या बाबतीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विधानसभेत उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री यांनी मान्य केले की, पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये काही गंभीर तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लक्षात घेऊन शासनाने यावर काम सुरू केले असून तांत्रिक सल्लागारांच्या मदतीने सुधारणा प्रस्तावित करण्यात आले आहेत.

यासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी सभागृहात दिली. मंत्री महोदयांनी सांगितले की, शिक्षक भरती प्रक्रियेत गरजेनुसार बदल केले जातील आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान आणि न्याय्य केली जाईल. सरकार या मुद्यावर गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या भरतीप्रक्रियेतील गोंधळामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते. अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेला मुद्दा केवळ एक राजकीय टीका नव्हे, तर समाजाच्या जडणघडणीशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.

Pravin Datke : अल्पसंख्यांक शाळांत मराठीचे गूढ

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!