वरुडमध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर भाजपने खोटे आरोप केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करत पोलीस ठाण्यावर धडक दिली.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकार अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गठबंधन ही आपुलकी, एकता आणि निष्ठावंत नेतृत्वासाठी ओळखली जाते. मात्र वरुड तालुक्यात सध्या सुरू असलेली राजकीय घुसमट ही महायुतीतील अंतर्गत मतभेदांचे दर्शन घडवत आहे. एकीकडे विकासकामांच्या रद्दबातल निर्णयाने संतापलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तर दुसरीकडे भाजपच्या गटातून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप. यामुळे वरुडमध्ये राजकारण पेटले आहे. या साऱ्या संघर्षाचं केंद्रबिंदू ठरलं वरुड पोलीस ठाणे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वरुड पोलीस ठाण्यावर धडक देत भाजपवर गंभीर आरोप केले.
कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या आहे. त्यामुळे मतदारसंघात असंतोषाचा कल वाढत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या राजकीय संघर्षाला तोंड फोडलं ते माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका आरोपाने. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की, वरुड, मोर्शी आणि शेघाट नगर परिषद क्षेत्रासाठी त्यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेली तब्बल १५ कोटी रुपयांची विकासकामे विद्यमान आमदार उमेश यावलकर यांनी रद्द करून घेतली.
Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी
तात्काळ मंजुरीची मागणी
हे कामे रद्द करण्यासाठी आमदार यावलकर यांनी शासनाला पत्र लिहिलं होतं, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आरोपांनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुयार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा पलटवार केला. या परिषदेतील भाषेचा सूर अशोभनीय असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नमूद करत तीव्र निषेध नोंदवला. यातून सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सध्या वरुडच्या राजकारणावर गडद सावली टाकतो आहे. २३ जून रोजी वरुड विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, भुयार यांनी मंजूर केलेली विकासकामे रद्द झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरुड, मोर्शी व शेघाट परिसरातील मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक विकास कामांवर गदा आली आहे. ही कामं तात्काळ मंजूर करून जनतेच्या हिताचे रक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तारेश देशमुख, तालुका अध्यक्ष विजय वडस्कर, युवक अध्यक्ष निलेश गोमकाळे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्वांनी एकमुखाने विद्यमान आमदार उमेश यावलकर यांचा निषेध केला. विकास कामांची पुनर्मंजुरी करण्याचा आग्रह धरला.
Abhijit Wanjarri : शिक्षक भरतीतील तांत्रिक अडचणींचा आमदारांनी केला भांडाफोड