महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : चेटकीण भाजप आणि टँगोचा नाच

Congress : प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा भारतीय जनता पक्षावर घणाघात

Author

भारतीय जनता पक्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड शब्दांत घणाघात करत थेट चेटकीण अशी उपमा दिली. पत्रकार परिषदेत भाजपच्या नेते पळवणुकीपासून दारू परवाना घोटाळ्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्फोटक आरोप केले.

राजकीय रंगमंचावर एका स्फोटक आणि सर्जनशील भाषेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जबरदस्त हल्ला चढवला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपची तुलना थेट राजकीय चेटकीणशी केली. भाजप ही चेटकीण आहे, तिला दुसऱ्या पक्षातील लोक गिळायचा रोग जडला आहे, असे शब्दशः विधान करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय वृत्तीवर जोरदार टीका केली.

सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपकडे 56 इंच छातीचा नेता आहे, असा दावा केला जातो, पण तो केवळ एक प्रचारकी देखावा आहे. वास्तविकता अशी आहे की भाजपमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी दुसऱ्या पक्षांतील नेते, पदाधिकारी यांना दबाव, धमक्या आणि प्रलोभनांच्या माध्यमातून भाजपात सामील होण्यास भाग पाडले जाते. ही भाजपची राजकीय संस्कृती आहे, जी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करते, पण विचारांना संपवता येत नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न

पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात सुरु असलेल्या दारु परवाना वाटपाच्या प्रक्रियेलाही चांगलेच धारेवर धरले. त्यांनी थेट आरोप केला की, काही विशिष्ट कंपन्यांना दारू परवाने खुले करून फायदा मिळावा, यासाठी पुण्याचे पालकमंत्री, जे स्वतःच उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आहेत, हे प्रयत्न करत आहेत. टँगो नावाचा ब्रँड कोणाच्या मालकीचा आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अशा प्रकारची हितसंबंधांची गुंतवणूक असलेल्या मंत्र्याकडून उत्पादन शुल्क खाते तात्काळ काढून घ्यावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्षत्यागावरही भाष्य केले. सपकाळ म्हणाले, काँग्रेस पक्ष नेत्यांचा नव्हे तर विचारांचा पक्ष आहे. कोणी पक्ष सोडून गेलं म्हणून पक्ष संपत नाही. जे पक्ष सोडतात ते आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगतात, पण असा अन्याय आम्हालाही व्हावा, असं आमचे काही पदाधिकारी म्हणतात. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, पक्षत्याग करणाऱ्यांना जनता आणि कार्यकर्तेच योग्य वेळी जाब विचारतील.

Sandip Joshi : गप्प बसलेल्या आयुक्तांना जबाबदारीचा दंडुका

विद्यापीठाची उन्नती

राजकीय टीका आणि विचारमंथनाच्या या सत्रानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाबाबत सांत्वन व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं की, डॉ. दीपक टिळक हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रभावी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्नतीत आणि ‘केसरी’च्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

या भेटीवेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आणि पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी एकीकडे भाजपच्या सत्तेतील सत्तेच्या गैरवापरावर प्रहार केला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची बाजू ठामपणे मांडली. राजकीय नाट्यात हा एक स्फोटक प्रवेश ठरला असून पुढील दिवसांत याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!