जनसुरक्षा विधेयकावेळी गैरहजर राहिलेल्या वडेट्टीवारांकडे काँग्रेसने स्पष्टीकरण मागितल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार म्हणाले, गप्प नव्हतो, विरोध अजूनही ठाम आहे.
लोकशाहीच्या मंदिरात नुकतेच एक नवे विधेयक मंजूर झाले. ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक’. सरकारचा दावा आहे की, हे देशविरोधी विचारांवर, विशेषतः शहरी नक्षलवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणले आहे. मात्र विरोधकांच्या मते, हे विधेयक म्हणजे जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे. सरकारची ही पावले लोकशाहीची मुळे कमजोर करणारी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
या वादळाच्या केंद्रस्थानी सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील विधिमंडळातील पक्षनेते वडेट्टीवार यांच्याकडे विचारणा केली आहे की, विधेयकाच्या विरोधासाठी काय पावले उचलण्यात आली? वडेट्टीवारांना याबाबत नोटीस देण्यात आली असल्याची चर्चा सुरू असली तरी, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
पक्षश्रेष्ठींना सादर करणार
या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर आपली बाजू स्पष्ट करत सांगितले की, त्या दिवशी ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उपस्थित होते. त्यामुळे ते सभागृहात राहू शकले नाहीत. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यांनी भूमिका घेतली नाही. त्यांच्या मते, प्रदेशाध्यक्षांनी एक नोट पाठवली होती, त्यानंतर एक पत्रही आले. या सगळ्यावर आधारित अहवाल त्यांनी तयार केला असून, तो लवकरच पक्षश्रेष्ठींना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी या विधेयकावर टीका करताना ठाम शब्दात मत व्यक्त केलं की, हे सरकारचा अपयश झाकण्याचा डाव आहे. त्यांच्या मते, सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. या कायद्यातील तरतुदी अत्यंत धोकादायक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधान रक्षण करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याची भीती या कायद्यात आहे.
राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकारचे खरे उद्दिष्ट म्हणजे मनुस्मृतीचा अजेंडा राबवणे आहे. धार्मिकतेच्या नावावर समाजात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेहमीच अशा विचारांना आणि कायद्यांना विरोध करेल. सर्व धर्मांमध्ये समता आणि समन्याय हाच काँग्रेसचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या विधेयकामुळे काँग्रेसच्या अंतर्गत चर्चाही गहिऱ्या होत आहेत. वडेट्टीवार यांच्यावर आलेला दबाव आणि त्यावर त्यांनी दिलेले प्रत्युत्तर, यातून पक्षातील वैचारिक मतभेदही समोर येऊ लागले आहेत. काँग्रेसच्या ‘दिल्ली दरबारी’ नेतृत्वाकडून यापुढे काय पावले उचलली जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.