विधानभवनाच्या लॉबीत थेट हाणामारीचा थरार पाहायला मिळाला, जेथे आमदारांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फौजदारी कारवाईचा थेट इशारा दिला आहे.
विधानभवन परिसरात घडलेली घटना महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासावर काळं ठिपकाच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वैयक्तिक वाद रेटा-रेटीनंतर थेट समर्थकांच्या हातघाईवर गेला. थेट विधानभवनाच्या लॉबीत दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेने एका बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उभा केला, तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळाच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह लावले.
या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा हिंसक प्रकारांना विधिमंडळाच्या चार भिंतींच्या आत मुळीच स्थान नाही. संबंधितांवर फौजदारी कारवाई होणारच, असा स्पष्ट इशारा नार्वेकरांनी दिला. नार्वेकर पुढे म्हणाले, माझ्या अधिकारात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा मी वापर करणार आहे. लोकशाहीची शिस्त भंग करणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे. अहवाल मागवला असून, त्यानुसार कठोर पावले उचलली जातील.
समर्थकांची थेट हातघाई
हा संघर्ष तसा एकाच दिवसाचा नव्हता. मागील आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर, असा आरोप करत घोषणाबाजी केली होती. यानंतर दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. त्यानंतर दोघांमध्ये गेटवरच शाब्दिक चकमक झाली. त्यात पडळकर यांच्या समर्थकांनी आव्हाड यांना धमकी दिली.
आव्हाड यांना धमकी आल्यानंतर हाच वाद पेटला आणि थेट शारीरिक धक्काबुकीपर्यंत गेला. लॉबीत दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी, ढकलाढकली, कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. उपस्थित आमदार, कर्मचारी आणि पत्रकार गोंधळात सापडले. काहींनी घटनास्थळावरून पळ काढला. आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांना यामध्ये जबर मारहाण झाल्याची माहितीही समोर आली आहे.
Parinay Fuke : सत्तेच्या मूक वाऱ्यातून उठली आरोग्यहक्कांची वीज
मौनाची तलवार कायम
घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र संयम राखत ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मला अतीव दुःख झालंय. मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत अधिक भाष्य टाळलं. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पुढील प्रतिक्रिया देईन, असं सांगून पडळकरांनी जबाबदारीपासून काहीसा माघार घेतल्याचे चित्र होते.
विधानभवन म्हणजे राज्याच्या लोकशाहीचा सर्वोच्च मंदिर. तिथेच जर आमदारांचे समर्थक हातातोंडाशी गेले, तर हा लोकशाही व्यवस्थेवरच गालबोट नाही का? या घटनेने केवळ एक वाद नाही तर संपूर्ण विधिमंडळाची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे. सरकारची सुरक्षा व्यवस्था, सदस्यांची शिस्त, आणि संसदीय मर्यादा या सर्व गोष्टींवर ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करते.
राहुल नार्वेकर यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला असला, तरी खरंच या प्रकारावर कडक पावले उचलली जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण विधिमंडळ म्हणजे संघर्ष नव्हे, संवादाचा मंच आणि जर तिथेच घूंघटाआडचे घाव सुरू झाले, तर कायद्याचे घरच सुरक्षित राहील का?