महाराष्ट्र

Monsoon Session : हातवारे झाले वादाचे वारे, आता हात जोडून क्षमायाचना 

Bhaskar Deshmukh : सभागृहाच्या आचनावर धुळवड; आता पश्चातापाच्या पायघड्या 

Author

अधिवेशनादरम्यान सभागृहात अध्यक्षांवर हातवारे केले. त्यानंतर बाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना अध्यक्षांवर टीका केल्याप्रकरणी भास्कर जाधव अडचणीत आले. सभागृहात माफी मागून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या बाहेर 17 जुलै रोजी एक असं वक्तव्य घडलं, ज्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना केवळ शब्दच नव्हे, तर आक्षेपार्ह हातवारेही केल्याचा आरोप झाला. या प्रकारामुळे सभागृहाबाहेरचा वाद थेट सभागृहाच्या आत चर्चेचा विषय ठरला.

या मुद्द्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. अध्यक्षांविरोधात अश्लील हातवारे आणि टीका करणं, ही सभागृहाच्या सर्वोच्च आसनाचा अवमान करणारी गोष्ट आहे. याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांनी माफी मागावी किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.

संयमी प्रतिक्रिया

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संयम राखत या प्रकरणावर भाष्य केले. प्रत्येक सदस्य लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे सभागृहाच्या आत आणि बाहेरही वर्तन जबाबदारीचं असावं लागतं. सभागृहाच्या पवित्रतेस कोणतीही ठेच लागू नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. भास्कर जाधव यांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त करत विधानसभाध्यक्षांवर थेट आरोप केले. आपण 293 अंतर्गत प्रस्ताव मांडला होता, तरी मला अडवलं जातं. अध्यक्ष दुतोंडी आहेत. ते स्वतःलाच सरकार समजतात आणि उत्तरंही स्वतःच देऊ पाहतात, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

अंतर्मुख झालेले जाधव 

वादाचं गांभीर्य लक्षात घेत जाधव यांनी सभागृहात स्वतःहून उभं राहत माफी मागितली. “मी जे बोललो ते घरी जाऊन पाहिलं. मलाही वाईट वाटलं. माझ्या इतक्या वर्षांच्या कार्यकाळात कधीही अशा प्रकारची वेळ आली नव्हती. परंतु यावेळी चूक झाली. मी अध्यक्षांनी दिलेली कोणतीही शिक्षा स्वीकारायला तयार आहे, असं त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं. आपल्या भाषणात जाधव यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. जेव्हा मी सभागृहात बोलायला उभा राहतो, तेव्हा सत्ताधारी बाकावरून जाणूनबुजून गोंधळ घालून मला अडवलं जातं. मला टार्गेट केलं जातं, असा आरोप करत त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.

Vijay Wadettiwar : लाथा – बुक्क्यांचा नंगानाच, वडेट्टीवारांची अध्यक्षांना हाक 

स्वतःवरची टोचणी

जाधव पुढे म्हणाले, मी सभागृहाच्या नियमांबद्दल आग्रही असतो. त्यामुळे माझ्याकडून असा शब्द किंवा हावभाव होऊ नये, याची मला जाणीव आहे. मी माफी मागावी की नाही, हे माझ्या अंतःकरणालाच विचारीत होतो. पण आता मी खुलेआम सांगतो की हो, चूक झाली आणि मी माफी मागतो, असं स्पष्ट करत त्यांनी चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव यांनी माफी मागून वाद निवळण्याचा प्रयत्न केला असला, तरी मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी अजूनही कायम आहे – की केवळ माफी पुरेशी नाही, तर योग्य ती शिस्तभंगाची कारवाईही झाली पाहिजे. त्यामुळे आता सभागृहाच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 मर्यादांची रेषा ओलांडली ?

या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे वागावे, याचा गंभीर पुनर्विचार होतोय. सभागृहाच्या बाहेर व्यक्त झालेल्या भावना आक्रमक असल्या, तरी त्या मर्यादेत राहून व्यक्त होणे अपेक्षित असते, हे या प्रकरणाने स्पष्ट केलं आहे. ज्यांनी वाद निर्माण केला, त्याच जिभेने आणि हाताने आता माफी मागण्यात आली आहे. पण विधानभवनाची प्रतिष्ठा राखायची असेल, तर शब्द, हावभाव आणि वर्तन या साऱ्यांवरच समान बंधनं लागू असावी लागतील. भास्कर जाधवांनी हात जोडले, आता निर्णय विधिमंडळाच्या हातात.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!