महाराष्ट्र

Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात

NCP Politics : पत्रकार परिषद गोंधळ आणि वरात गेली मुंबईला

Author

लातूरमध्ये छावा संघटनेच्या संतप्त निषेधानंतर सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ गाजला आहे. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी त्यांना थेट मुंबईत बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पत्त्यांचा खेळ पेटला आणि राजकारणात भडका उडाला. लातूरच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्याच्या वादावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सभास्थळीच पत्ते उधळत निषेध केला. पण याच वेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी संताप अनावर करत छावा कार्यकर्त्यांना सर्रास मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि तिथून सुरू झाला राजकीय वादळाचा खेळ.

या मारहाणीचा परिणाम असा झाला की, विरोधकांनी महायुती सरकारवर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर तुटून पडत सरकारची मान खाली घालायला लावली. एकीकडे विधिमंडळात मंत्री मोबाईलवर रम्मी खेळत आहेत, तर दुसरीकडे पत्रकार परिषदेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लोकांना मारहाण केली जाते, असा आरोप करत विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात 

गैरसमज दूर करणार

यामुळे सूरज चव्हाण यांनी पुढे येत एक व्हिडीओ जाहीर केला. त्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त करत, मी लवकरच विजय घाडगेपाटलांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार आहे, असं सांगितलं. मात्र, ही दिलगिरी पुरेशी वाटली नाही. कारण छावा कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आणि चव्हाण यांच्यावर दबाव वाढत गेला.

दरम्यान, ही आग पसरत असतानाच अजित पवारांनी स्वतः यात लक्ष घालून सूरज चव्हाण यांना थेट मुंबईत बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारावर स्पष्टीकरण घेण्यासाठी आणि पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठीच अजित पवारांनी त्यांना तातडीने पाचारण केलं. त्यामुळे, आता सूरज चव्हाण यांच्यावर फक्त समज दिली जाणार की पक्षीय कारवाई होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nitin Gadkari : विदर्भातील वाळवंटात ‘मनोरंजनाचा मरिन ड्राईव्ह’

डॅमेज कंट्रोल

याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना त्यांच्या पुढील दौऱ्यातून वगळल्याचं स्पष्ट झालं आहे. यामागे “सावधगिरी” दाखवली गेली असली, तरी प्रत्यक्षात हा निर्णय म्हणजे पक्षाच्या ‘डॅमेज कंट्रोल’ यंत्रणेचा भाग असल्याचं बोललं जातं. स्वतः सूरज चव्हाण यांनी मात्र माझे बोट फ्रॅक्चर झाले आहे, त्यामुळे मी लातूरमध्ये राहून उपचार घेणार आहे, असं सांगून परिस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सगळं सुरू असतानाच छावा संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. सोशल मीडियावर संतापाचा भडका उडतो आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरत आहे. आणि म्हणूनच अजित पवार यांचा निर्णय हे या प्रकरणातले निर्णायक पाऊल ठरणार आहे.

सध्याची परिस्थिती ही एक वेगळीच राजकीय शह-काटशहाची इनिंग उघडते आहे. ‘पत्ते उधळल्यावर’ खेळ फक्त टेबलवरच मर्यादित राहत नाही, तर तो थेट दिल्ली-मुंबईच्या राजकीय नकाशावर परिणाम करतो, हेच पुन्हा सिद्ध झालं आहे. आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते एकाच गोष्टीकडे की, अजितदादा काय निर्णय घेणार?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!