महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : गुन्हेगारांची सत्ता करतेय महाराष्ट्राची थट्टा

Congress : प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पुन्हा महायुतीला डिवचले 

Author

राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, सत्ताधारी मंत्र्यांचा पत्त्यांचा खेळ आणि पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी उघड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तेची सत्ता नसून माजाचं दडपण दिसतंय. दररोज 6 शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषीमंत्री चक्क विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो, तर दुसरीकडे विरोध करणाऱ्या आंदोलकांवर सत्ताधाऱ्यांचे गुंड चाल करून येतात. हे सरकार जनतेच्या प्रश्नांपासून नाही, तर सत्तेच्या झुल्यात रमलेलं आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ज्यांच्या हाती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचे भवितव्य आहे, तेच मंत्री विधानसभेत पत्त्यांच्या दुनियेत रमले आहेत. दररोज 6 शेतकरी आत्महत्या करत असताना, कृषी मंत्री रमीत मग्न होतो. हे महाराष्ट्राच्या शरमेचं आणि सरकारच्या संवेदनशून्यतेचं प्रतीक आहे,” अशी आगपाखड करताना हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही जोरदार टिका केली. मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा मंत्री विधानसभेत रमी खेळतो, तेव्हा ते काहीच बोलत नाहीत. विरोधकांवर कारवाई करणाऱ्यांनी आता आपल्या माजलेल्या मंत्र्यालाही आवर घालावा, असा टोला त्यांनी लगावला.

Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात

गुंडगिरीचा तमाशा

लातूरमध्ये छावा संघटनेने पत्त्यांचा सेट देऊन निषेध केला, पण या लोकशाही मार्गाने केलेल्या निषेधावर सत्ताधाऱ्यांचे गुंड तुटून पडले. अजित पवारांच्या पाळलेल्या गुंडांनी आंदोलक कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं. ही गुंडशाही नव्हे तर सत्तेचा उन्माद आहे, असा संताप व्यक्त करत सपकाळ म्हणाले, हेच जर विरोधकांनी केलं असतं, तर त्यांच्यावर अटकेच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले असते.

सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात आता हनीट्रॅपचा फास अडकत असल्याचं सूचक वक्तव्य करत सपकाळ म्हणाले, राज्यातील काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात सापडले आहेत, हे विधानसभेत सांगितलं गेलं, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘असं काहीच घडलं नाही,’ असं निवेदन देऊन धादांत खोटं बोललं.

हनीट्रॅप वरून घणाघात 

सपकाळांनी असा आरोप केला की, या हनीट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे भाजपच्या उच्च पातळीवर पोहचले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अत्यंत निकटच्या मंत्र्याचा फोटो हनीट्रॅपमधील महिलेबरोबर सोशल मीडियावर झळकतोय, तरीही सरकार हे प्रकरण झाकून टाकू पाहतंय. आम्ही मागणी करतो की, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा हे सरकार जनतेसमोर जबाबदार ठरेल.

शेतकरी मरतोय, विद्यार्थी भरडतोय, महिलांचं रक्षण होत नाही आणि मंत्र्यांचे मोबाईलवर खेळ सुरू असतात. सभागृहात प्रश्न विचारले तर उत्तरं मिळत नाहीत, उलट विरोधकांवरच दबाव आणला जातो, हा प्रकार म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. हे सरकार आता ‘माज आणि मस्ती’ या दोन शब्दांतच माहीर झालंय, अशी तिखट भाषा वापरत सपकाळांनी सरकारला सावध केलं.

सपकाळ शेवटी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी जर खरंच माज उतरवायची धमक असेल, तर आधी आपल्या मंत्र्यांचा मोबाईल हातातून काढा, त्यांना घरी पाठवा आणि पदाधिकाऱ्यांच्या रूपातील गुंडांना तुरुंगात पाठवा. हा राडा, हे हनीट्रॅप आणि हे रमीत रमलेले मंत्री, हे महाराष्ट्र सहन करणार नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!