महाराष्ट्र

NCP Politics : पत्त्यांची खेळी पेटली, परिषदेत मारहाण केली अन् खुर्चीच हातून गेली

Ajit Pawar : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दादांचा राजीनाम्याचा आदेश 

Author

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकल्याच्या प्रकरणाचा थेट राजकीय झटका सूरज चव्हाण यांना बसला आहे. अजित पवारांनी स्वतः हस्तक्षेप करत त्यांना पदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

राजकारणात कधी एक क्षुल्लक क्षणही भूकंप घडवतो. लातूरमधील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत अशीच एक चूक झाली आणि तिचा राजकीय दणका थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या खुर्चीवर बसला. छावा संघटनेचे काही कार्यकर्ते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन घेऊन तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पोहोचले आणि संतप्तपणे व्यासपीठासमोर पत्ते फेकले. या घटनेनंतर वातावरण चिघळले.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाले आणि त्यांच्याकडून छावा कार्यकर्त्यांवर मारहाण झाली. झटापटीच्या या प्रकरणात सूरज चव्हाण यांचा थेट सहभाग समोर आला. याच घटनाक्रमामुळे सुरू झाला एक वेगळाच राजकीय वादळ, ज्याचा निकाल झाला थेट राजीनाम्यात.

Harshwardhan Sapkal : गुन्हेगारांची सत्ता करतेय महाराष्ट्राची थट्टा

कठोर खेळी

अजित पवारांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यांनी 21 जुलै सोमवारी रात्री स्वतः ट्विट करत ही माहिती जाहीर केली.

20 जुलै रोजी लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात

जळजळीत प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा पत्ते फेकून निषेध नोंदवला, त्याच वेळी संतप्त राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला आणि त्यात सूरज चव्हाण आघाडीवर होते, असं स्पष्ट झालं. तटकरे यांनी या घटनेनंतर दिलेल्या प्रतिक्रिया जळजळीत होत्या. त्यांच्या संतापामुळेच हे प्रकरण अजित पवारांपर्यंत पोहोचलं आणि त्यातून सूरज चव्हाण यांच्यावर ही थेट कारवाई घडून आली.

अजित पवार हे पक्षशिस्तीबाबत नेहमीच ठाम राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही पदाधिकाऱ्याला सहन केलं जाणार नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य आहे, याचं उदाहरण ठसलं आहे. ही कारवाई इतरांसाठीही एक इशारा आहे, पक्षाच्या नावावर वागणाऱ्याने वागणूक सुद्धा पक्षाच्या चौकटीत राहूनच दिली पाहिजे.

लातूरच्या पत्त्यांनी सूरज चव्हाण यांची खुर्ची नेली, पण या खेळात अजून बरेच डाव बाकी आहेत. अजित पवारांचे निर्णय पक्षातील इतरांना धडा देणारे ठरत आहेत. हा निर्णय दाखवतो की, पक्षाच्या चौकटीतून जर कुणी बाहेर गेला, तर त्याचं राजकारण ‘शॉर्ट सर्किट’ होणारच.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!