वक्तव्यांमध्ये आक्रमक आणि कृतीत वादग्रस्त, आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट इम्तियाज जलील यांना आझाद मैदानात सामोरा-समोर येण्याचं उघड आव्हान दिलं आहे.
वादग्रस्त विधानांचे जणू दुसरे नावच झालेले. बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष स्वतःकडे खेचलं आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर आहेत एमआयएमचे माजी खासदार आणि पक्षनेते इम्तियाज जलील. याआधीच वेटरला मारहाण केल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या गायकवाड यांनी आता थेट जलील यांना ‘आझाद मैदानात दोघंच भेटू, कुणी तिसरा नको,’ असं थेट चॅलेंज देत, राजकारणाच्या भाषेला नवा आक्रमक रंग दिला आहे.
हे वक्तव्य केवळ एक राजकीय प्रतिक्रियाच नाही. ही जणू एक प्रकारची ओपन इन्व्हिटेशन टू बॉक्सिंग रिंग आहे. गायकवाड म्हणाले, इम्तियाज जलीलने पोलीस महासंचालकांना एफिडेविट करून द्यावं की आमच्यात काही वाईट घडलं, तर जबाबदार आम्ही दोघंच. मग मी त्याला आझाद मैदानावर बोलवतो. तिथे पोलिसांसमोर ठरवू, कुणात किती दम आहे. ही भाषा केवळ राजकारणातील वैचारिक संघर्ष न राहता ती प्रत्यक्ष टकरावाची धमकी ठरत आहे.
BJP : विरोधकांच्या आरोपांचा खुळखुळा, बावनकुळेंनी फोडला हनीट्रॅपचा बुडबुडा
आक्रमक शैली
विशेष म्हणजे, केवळ तीनच दिवसांपूर्वी गायकवाड यांनी माध्यमांपासून ‘आता मी दूर राहीन’, असा निर्धार व्यक्त केला होता. मात्र आता त्यांनी स्वतःच तो निर्धार मोडीत काढला आणि माईक समोर पुन्हा आक्रमक शैलीने धमकावलं. त्यांच्या विधानांचा सूर आणि शैली पाहता, त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘वादग्रस्त वक्तव्यांच्या ट्रेडमार्क’ ची आठवण करून दिली आहे.
इम्तियाज जलील यांनी बुलढाण्यातील दौऱ्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “मी इथे कुणाच्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी नाही आलो. मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे. हे सांगत त्यांनी वादातून बाहेर राहण्याचा प्रयत्न केला. पण गायकवाड यांनी मात्र त्यांच्या शांत भाषेला आगीत तेल ओतणाऱ्या प्रतिक्रियांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं, पोलिसांच्या विनंतीमुळे त्याला बुलढाण्यात पाय ठेवता आला. मी जर त्याच्याविषयी द्वेष बाळगला असता, तर त्याला मराठवाड्याची सीमा पारही करू दिली नसती.
Jagdeep Dhankhar : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपराष्ट्रपतींचा राजीनामा
आपसी वाद
गायकवाड यांचे हे विधान म्हणजे केवळ व्यक्तिगत टीका नाही, तर जलील यांची सार्वजनिक प्रतिष्ठाच आव्हानात टाकणारा प्रकार आहे. यामध्ये धर्म, समाज आणि पोलिस व्यवस्था यांचा उल्लेख करत गायकवाड यांनी या वादाला गंभीर वळण दिलं आहे. हा वाद हिंदू-मुस्लिम नाही, हा माझा आणि त्याचा आहे, असं स्पष्ट करूनही त्यांच्या विधानात प्रक्षोभक भावनांची ठिणगी दिसून येते.
राजकीय क्षेत्रातील वाद हे बहुधा विधानांवर, मुद्द्यांवर आणि नितीविषयक दृष्टिकोनावर आधारित असतात. मात्र संजय गायकवाड यांनी हे वाद विधानांवरून थेट मैदानावर खेचले आहेत. ‘तू आणि मी, आझाद मैदानात, बाकी सगळे बाहेर!’ हे त्यांचं वक्तव्य हे केवळ राजकारणातील नव्हे तर समाजातील देखील चिंता वाढवणारं आहे.
चर्चेचे केंद्रबिंदू
संजय गायकवाड हे आधीही अनेकदा त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. कधी प्रशासनावर ताशेरे ओढणे, कधी सहकाऱ्यांवर उपरोधिक टीका, तर कधी रस्त्यावरच्या वादात मारहाण. अशा घटनांचा त्यांच्या राजकीय प्रवासाशी अविभाज्य संबंध बनला आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे एका क्षणी थेट, दुसऱ्या क्षणी आक्रमक आणि कायम चर्चेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो की, महाराष्ट्रात राजकीय परिपक्वतेची ही पातळी आहे का? वैचारिक वाद हे नक्कीच लोकशाहीचा भाग आहेत, पण ते जर अंगावर घेणाऱ्या शैलीत उतरले, तर तो लोकशाहीसाठी घातक इशारा ठरतो. एकीकडे जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रतिनिधींनी एकत्र यावं, आणि दुसरीकडे हेच प्रतिनिधी एकमेकांना आझाद मैदानात भिडण्याची भाषा करतात, हा विरोधाभास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
संजय गायकवाड यांचे हे वक्तव्य आणि त्यातील थेट आमंत्रण केवळ चर्चेपुरतं मर्यादित राहतं की खरोखरच पुढे काही भडकतं, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित की, गायकवाड यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की वादग्रस्ततेच्या झगमगाटात त्यांचा नवा कोणी नाही.