महाराष्ट्र

Jagdeep Dhankhar : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपराष्ट्रपतींचा राजीनामा

Resignation Of Vice President : धनखडांचा अनपेक्षित निर्णय

Author

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य कारणांचा हवाला देत आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

भारतीय राजकारणात एक महत्त्वाचा आणि थोडा धक्कादायक वळण आज दिसून आला. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै सोमवारी आपल्या पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही राजकीय घडामोड घडल्याने चर्चांना उधाण आले आहे. धनखड यांनी आरोग्य कारणांचा हवाला देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सादर केला असून, हे पत्र अत्यंत भावनिक आणि स्पष्ट शब्दांत लिहिले गेले आहे.

जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या वैद्यकीय सल्लागारांच्या सूचनेनुसार, मला दीर्घकालीन उपचार आणि विश्रांतीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा सादर करत आहे. विशेष म्हणजे, मागील मार्च महिन्यात धनखड यांना एम्स रुग्णालयात हृदयाशी संबंधित इन्फेक्शनमुळे दाखल करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती, ज्यावरून त्यांच्या आरोग्याच्या समस्यांची गांभीर्यपूर्ण स्थिती अधोरेखित होते.

Nagpur : झुडपी संघर्षातून न्यायाचा अंकुर, सर्वोच्च आदेशाने सरकारला हलवले 

पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचे आभार

धनखड यांनी आपल्या पत्रात केवळ राजीनाम्याची घोषणा केली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आणि संसदेतील सहकाऱ्यांचेही आभार मानले. माझ्या कार्यकाळात मला मिळालेले सहकार्य आणि सन्मान मी कधीच विसरू शकत नाही. हे माझ्यासाठी गौरवाचे क्षण होते, असे ते म्हणाले. धनखड यांची 6 ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. त्यांनी विरोधी पक्षाच्या मार्गरेट अल्वा यांचा पराभव करत 528 मते मिळवली होती. तर अल्वा यांना केवळ 182 मते मिळाली. याआधी 2019 मध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या कार्यशैलीतील स्पष्टवक्ता आणि संविधाननिष्ठ दृष्टिकोनामुळे ते नेहमी चर्चेत राहिले.

ठसा उमटवणारे उपराष्ट्रपती

धनखड यांच्या काळात राज्यसभेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि गतीशील झाले होते. अनेक वेळा त्यांनी गदारोळ करणाऱ्या सदस्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. सभागृहाच्या सन्मानाची राखण त्यांनी नेहमी केली. विशेष म्हणजे, त्यांनी विविध राजकीय मतभेद असूनही, सभागृहातील सर्व पक्षांशी संवाद राखत सहकार्याचा पायंडा पाडला होता. धनखड यांच्या तात्काळ राजीनाम्यामुळे आता देशात नव्या उपराष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काही दिवसांत निवड आयोग नव्या निवडणुकीची घोषणा करेल. यावेळी कोण उमेदवार असेल, सत्ताधारी पक्षाची रणनीती काय असेल, याबाबत चर्चांना जोर चढत आहे.

Sanjay Gaikwad : माईक नाही, आता मसल्स; गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना चॅलेंज 

भावनिक निरोप

धनखड यांच्या या निर्णयामध्ये केवळ आरोग्याच्या चिंतेचा संदर्भ नाही, तर एक संवेदनशील आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी घेतलेला परिपक्व निर्णय आहे. आज भारतीय संसदेने एका अनुभवी आणि तटस्थ उपराष्ट्रपतीला निरोप दिला आहे, ज्यांच्या कार्यकाळात नियम, शिस्त आणि संविधानाचा सन्मान यांचा आग्रह सातत्याने ठेवला गेला. राजीनामा देणं हे कोणत्याही पदासाठी अवघड निर्णय असतो, पण धनखड यांनी त्यातही एक गरिमा आणि संवेदनशीलता जपली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते पुढच्या नावाकडे, जो या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी स्वीकारेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!