महाराष्ट्र

Devendra Fadnavis : कृषिमंत्र्यांचा कॅबिनेट कॅसिनो, जबाबदारीच्या खेळात अपात्र

Rummy Circle : कोकाटेंनी काहीही सांगितले तरीही ते भूषणावह नाही

Author

विधानसभेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हे आमच्यासाठी भूषणावह नाही, असा स्पष्ट शब्दांत फटका दिला.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या एका व्हिडिओमुळे प्रचंड वादात सापडले आहेत. विधानसभेसारख्या गंभीर आणि जबाबदारीच्या व्यासपीठावर ते मोबाईलवर ‘रम्मी’ खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अखेर मौन सोडले असून, त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे, असं सांगत फडणवीसांनी सभागृहातील शिस्त आणि प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, विधानसभेत आपण सहभागी असताना, आपल्याला काम असो वा नसो, ही एक गंभीर संस्था आहे. तिथं गंभीरतेने उपस्थित राहणं आवश्यक असतं. कामकाजाचे कागद वाचणं किंवा अन्य शैक्षणिक वाचन करणं हे समजू शकतं, पण रम्मी खेळणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, पण त्यांनी काहीही सांगितलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही. फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे कोकाटेंच्या स्पष्टीकरणावर विश्वास न दाखवता त्यांचा खरपूस समाचार घेतला.

विश्वास ठेवायला तयार नाही

माणिकराव कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडताना सांगितलं की, मी रम्मी खेळत नव्हतो. मी यूट्यूब पाहत होतो आणि त्यात एक जाहिरात आली होती. ती स्किप करत होतो. मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडिओ समोर आणत कोकाटे रम्मी खेळत असल्याचा दावा पुन्हा अधोरेखित केला. त्यामुळे या प्रकरणाने अजूनच वेग घेतला आहे.

या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध व्यक्त केला. या संतप्त कृतीनंतर राष्ट्रवादीचे युवा नेते सूरज चव्हाण यांनी त्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीमुळे राजकीय तापमान आणखी वाढले असून, विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर चौफेर टीका केली आहे.

व्यक्तिशः चूक नव्हे 

सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी असताना, मंत्री सभागृहात मोबाइलवर खेळण्यात गुंग असल्याचं चित्र लोकशाही व्यवस्थेची थट्टा करतं, असं मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभेत रम्मी खेळणं ही केवळ व्यक्तिशः चूक नसून, ती संपूर्ण यंत्रणेची विश्वासार्हता डागाळणारी गोष्ट असल्याचं मत आता सर्वच स्तरातून उमटत आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून कठोर कारवाईची मागणी आता अधिक ठामपणे पुढे येत आहे.

या वादग्रस्त व्हिडिओमुळे केवळ माणिकराव कोकाटेच नव्हे, तर सरकारचीही प्रतिमा डागाळली आहे. विशेषतः ते कृषिमंत्री असल्यामुळे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतीविषयक धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, त्यांचा वेळ अशा प्रकारे वाया जात असेल तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या हितावर होतो. विधानसभेसारख्या पवित्र स्थळी जर मंत्री रम्मी खेळत असतील, तर मग जनतेच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया या सर्व प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करणारी आहे. आता सरकार या प्रकारावर कोणती कारवाई करते, कोकाटे यांना उत्तरदायित्वाच्या चौकटीत आणलं जातं का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकारातून एकच गोष्ट स्पष्ट होते, लोकशाहीतील प्रतिनिधींनी त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवली पाहिजे. कारण, एक चुकीचा डाव संपूर्ण सत्तेच्या खेळाला बदनाम करू शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!