महाराष्ट्र

Balwant Wankhade : एक दिवस, एक झेप अमरावतीची हाक दिल्लीपर्यंत 

Amravati : अमरावतीच्या विमान सेवेवर खासदार वानखडे यांची ठाम भूमिका

Author

अमरावती-मुंबई विमान सेवेची वेळ अयोग्य आणि भाडं आवाक्याबाहेर असल्याने, प्रवाशांचा त्रास वाढला आहे. ही सेवा अधिक उपयुक्त व्हावी, यासाठी खासदार बळवंतराव वानखडे यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे ठोस मागणी केली आहे.

विदर्भातील अमरावती हे शहर केवळ सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या नव्हे, तर प्रशासकीय आणि औद्योगिक महत्त्वही असलेले केंद्र आहे. मुंबईसारख्या राजकीय, आर्थिक आणि औद्योगिक राजधानीशी या शहराचे नाते अधिक सुकर व्हावे, यासाठी आकाशमार्ग हा एक उत्तम पर्याय ठरतो. परंतु, सध्या चालू असलेली अमरावती-मुंबई विमानसेवा केवळ नाममात्र आहे. वेळेच्या विसंगती आणि भाड्याच्या अवाजवी वाढीमुळे ती फारशी उपयुक्त ठरत नाही. हे लक्षात घेता, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी थेट नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा करून या मुद्द्यावर ठोस भूमिका मांडली आहे.

सध्या अलायन्स एअरमार्फत आठवड्यात केवळ दोन दिवस अमरावती ते मुंबई अशी विमानसेवा सुरू आहे. मात्र या विमानाची वेळ दुपारी असल्याने व्यावसायिक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग यांना फारसा फायदा होत नाही. सकाळी मुंबईला जाऊन संध्याकाळी परत येण्याची सोय नसल्याने, या सेवेवर अनेकांचे टीकेचे बोट आहे. त्यात भर म्हणजे या विमान प्रवासाचे भाडे इतके वाढले आहे की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

महत्त्वाचे तीन मागण्या

या पार्श्वभूमीवर खासदार वानखडे यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना दिलेल्या निवेदनात तीन मुख्य मागण्या मांडल्या आहेत. पहिली म्हणजे, अमरावतीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ सकाळी ठेवावी आणि परतीचे विमान संध्याकाळी असावे, जेणेकरून एका दिवसात काम उरकून परत येणे शक्य होईल. दुसरी म्हणजे, आठवड्यातील सेवा दिवस वाढवावे. तिसरी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे, विमानसेवेचे भाडे सामान्य जनतेला परवडणारे करावे.

या मागणीला प्रतिसाद देताना नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे ठाम आश्वासन दिले आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे अमरावतीकरांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

विकासाशी निगडित

अमरावतीमधील अनेक व्यापारी, अधिकारी वर्ग आणि विद्यार्थी यांनीही वानखडे यांच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे. स्थानिक व्यापारी संघटनांनीही हा प्रश्न केवळ विमानसेवेपुरता मर्यादित नसून, विदर्भाच्या एकूणच विकासाशी निगडित असल्याचे स्पष्ट केले आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास, अमरावतीमधून मुंबईकडे जाणाऱ्यांना वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

अमरावतीसारख्या झपाट्याने प्रगत होत असलेल्या शहरासाठी आधुनिक, सुटसुटीत आणि स्वस्त विमानसेवा ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून खासदार वानखडे यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी आवाज उठवला आहे. आता केंद्र सरकारने या मागण्यांची सकारात्मक दखल घेतल्यास, अमरावतीच्या आकाशाला खऱ्या अर्थाने उंच भरारी मिळू शकेल. आणि ही भरारी केवळ शहराची नव्हे, तर संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीची दिशा ठरू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!