महाराष्ट्र

Manikrao Kokate : रमी खेळताच येत नाही अन् मी राजीनामा देणार नाही 

Rummy Game Controversy : स्किपच्या सेकंदात राजकीय स्फोट 

Author

सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. मात्र, मी खेळलाच नाही, बदनामीचा कट रचला जातोय, असा दावा करत कोकाटेंनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे, सभागृहात रम्मी खेळणारा मंत्री. रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरणं सुरू केलंय. आंदोलनं पेटली आहेत, सभागृहात संतप्त घोषणा झडत आहेत. मात्र यावर कोकाटेंनी आता मोठं ‘काऊंटर’ केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, मी रम्मी खेळलेलो नाही, मला खेळताच येत नाही. याच विधानातून पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

कोकाटेंनी सांगितलं की, त्यांनी मोबाईल स्वतःच्या वापरासाठी घेतला नव्हता. ते फक्त अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यासाठी तो मोबाईल हातात घेतला होता. पण त्या मोबाईलमध्ये अचानक गेम सुरू झाला. तो गेम स्किप करण्याचा प्रयत्न करताना काही सेकंद गेले. हे सगळं एखाद्या सिनेमाच्या कटसारखं झालं, जिथे सुरुवात दाखवली जाते, पण शेवट कापला जातो. मी गेम स्किप केल्यावर काम केलं, तो भाग कुठे आहे? असा सवाल करत कोकाटेंनी आपल्या बदनामीसाठी हा सगळा कट असल्याचा आरोप केलाय.

Devendra Fadnavis : कृषिमंत्र्यांचा कॅबिनेट कॅसिनो, जबाबदारीच्या खेळात अपात्र

विरोधकांवर पलटवार

प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. ही माझी वैयक्तिक आणि राजकीय बदनामी करण्याची कटकारस्थानं सुरू आहेत, असं म्हणत त्यांनी थेट न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. मी हे सहन करणार नाही. जे मला बदनाम करत आहेत, त्यांना मी कोर्टात खेचणार, अशी थेट भाषा वापरत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. पुढे एक पाऊल टाकत, कोकाटेंनी सांगितलं की, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांना पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ही माझी मागणी आहे. म्हणजेच आता कोकाटेंनी आपल्या बचावासाठी संपूर्ण राजकीय यंत्रणेला खांद्यावर घेतलं आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या मागण्या अधिक तीव्र होत चालल्या आहेत. सभागृहासारख्या पवित्र ठिकाणी, जिथे राज्याच्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी, तिथे मंत्री मोबाईल गेम खेळत असतील, तर हे सरकार किती गांभीर्याने काम करतं? असा रोखठोक सवाल विरोधक विचारत आहेत. संपूर्ण प्रकरणावरून एक बाब स्पष्ट झाली आहे की, राजीनामा द्यायला कोकाटे तयार नाहीत. उलट, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी कोर्ट आणि चौकशी या दोन्ही मार्गांचा अवलंब करणार आहेत. पण विरोधक राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे या ‘मोबाईल रम्मी’ प्रकरणाचं रुपांतर एका मोठ्या राजकीय लढाईत होणार, हे निश्चित आहे.

कृषिमंत्र्यांचे प्रश्न

कोकाटेंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मोबाईल हातात घेताच गेम चालू झाला. त्याने काही सेकंद घेतले स्किप व्हायला, आणि त्याच वेळेत व्हिडिओ काढण्यात आला. मग असा व्हिडिओ खरेच अपूर्ण आहे का? जर कोकाटेंचं म्हणणं खरं असेल, तर व्हिडिओचा पुढचा भाग कुठे आहे? का तो सार्वजनिक केला जात नाही? आणि जर तो गेम स्किप करण्यात आला होता, तर ते फुटेज का गुप्त ठेवलं जातंय?

या प्रकरणात सध्या सत्य काय आहे यापेक्षा ‘कोण काय दाखवतंय’ आणि ‘कोण काय लपवतंय’ हेच मोठं वाटतं. ‘व्हिडिओ विरुद्ध वक्तव्य’ असा हा सामना सुरू आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मंत्री स्वतःच्या हातातलं कार्ड अजून उघड करत नाही, पण विरोधक त्यांना ‘गेम ओव्हर’ करायच्या तयारीत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!