राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भावूक अभिव्यक्ती करत त्यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक केले. त्यांच्या कार्यशैलीला ‘सुगंधी अत्तर’ाची उपमा देत बावनकुळे यांनी फडणवीसांच्या योगदानाचा व्यापक आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे एका सुगंधी अत्तरासारखं आहे. त्यांच्या सहवासातून प्रेरणा, प्रगती आणि लोकहिताचा गंध दरवळतो, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावनिक अभिव्यक्ती केली. केवळ राजकीय नाही, तर एक सखोल वैचारिक, व्यावसायिक आणि भावनिक नातं फडणवीस यांच्याशी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीसांचा सहवास अत्तरासारखा आहे. अत्तर जसा सुगंधी आणि प्रसन्न करणारा असतो. तसाच देवेंद्र फडणवीसांचा सहवास प्रेरणादायी, सकारात्मक ऊर्जा देणारा आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त अनोखी मानवंदना दिली.
नेतृत्वाची ठाम छाया
विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विधिमंडळ संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना लाभलेला अनुभव, नक्षलवादाविरोधात उभारलेली कायदेशीर लढाई आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाची ठाम छाया, यावर बावनकुळे यांनी भर दिला. गडचिरोलीच्या जंगलात जन्मलेला नक्षलवाद आज शहरांत पांढरपेशा चेहऱ्यांतून पसरतो आहे. अशा विघातक शक्तींविरुद्ध उभी राहणं हे आपल्या संविधानाचं रक्षण करणं आहे, असं ते म्हणाले. हे विधेयक प्रगतिशील आहे. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करताना राज्याची सुरक्षितताही बळकट करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
बावनकुळे यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरचा अनुभवही शेअर केला. तेव्हा संसदीय प्रक्रियेचं अधिक ज्ञान नव्हतं. फडणवीस यांनी मला विधिमंडळातील व्यवहार, निधी संकलनाची युक्ती आणि शासकीय व्यवहारांमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केलं, अशी आठवण त्यांनी सांगितली. ही नाती केवळ पक्षीय नाहीत, तर जीवनातली बंधनं आहेत, रक्ताच्या नात्याहूनही खोल.
समाजाला थेट फायदा
महसूल विभागात आज होत असलेल्या क्रांतिकारी बदलांचं श्रेयही त्यांनी फडणवीस यांच्या दूरदृष्टीला दिलं. तुकडेबंदी कायदा रद्द करणं, जमिनींना कायदेशीर मान्यता देणं, शेती वाटणी प्रक्रिया सुलभ करणं, आदिशक्ती अभियान, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेसारखे निर्णय समाजाच्या तळागाळातील घटकांना थेट फायदा पोहोचवत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यात झालेल्या महसूल परिषदेनंतर विभागाने घेतलेले झपाट्याने निर्णय, आणि नागपूर-अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना त्यांना मिळालेलं फडणवीस यांचं पाठबळ, याचा उल्लेख करत, बावनकुळे म्हणाले, विकासाचं नियोजन जेव्हा दूरदृष्टी आणि संवेदनशीलतेच्या बळावर होतं. तेव्हा प्रशासन लोकांशी अधिक जवळचं होतं.
योजनांचा विस्तार
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, जलयुक्त शिवार, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, विमानतळ विकास, धारावी पुनर्विकास. प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार यांचा उल्लेख करत, बावनकुळे म्हणाले, या योजनांमुळे महाराष्ट्राला औद्योगिक, शहरी आणि सामाजिक विकासाची एक नवी दिशा मिळाली आहे.
फडणवीस यांच्या सखोल अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले, राजकारणात केवळ लोकप्रियता नाही, तर निर्णयक्षम अभ्यास, संवेदनशीलता आणि जनतेविषयीची जबाबदारी हे गुण आवश्यक आहेत. हे गुण देवेंद्रजींकडे भरपूर आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देत, त्यांनी आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या, देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या भविष्यातील सुगंधी दिशा.