महाराष्ट्र

Manikrao Kokate : कृषिमंत्री शेतकऱ्यांना नाही, थेट सरकारलाच म्हणाले भिकारी

Manikrao Kokate : कृषिमंत्री शेतकऱ्यांना नाही, थेट सरकारलाच म्हणाले भिकारी Maharashtra Government : कोकाटेंनी भडकवले राजकारण 

Author

रमी खेळण्यावरून अडचणीत आलेले कृषिमंत्री यांनी आता थेट सरकारवरच निशाणा साधला आहे. कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकारण तापले असताना त्यांनी सरकारलाच धारेवर धरले.

राजकारणात कधी कधी शब्दांचं वजन तलवारीपेक्षाही अधिक तीव्र असतं. आता हेच सत्य ठरतंय राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे. विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या मनातही संतापाची वावटळ उठवणाऱ्या कोकाटेंनी आता थेट महाराष्ट्र सरकारच भिकारी आहे, असा फटका मारत, वादग्रस्ततेच्या शिखरावर झेप घेतली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंपाची चाहूल लागली आहे. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण द्यायला आलेले कोकाटे यांनी तोंड सांभाळा या नियमालाच हरताळ फासला. कोकाटे म्हणाले, मी शेतकऱ्यांना भिकारी म्हणालो नव्हतो, शासनच भिकारी आहे. हे त्यांचे विधान एकाच झटक्यात सरकारला अपमानित करणारे ठरले. एक रुपयात घेतला जाणारा पिकविमा शेतकऱ्यांकडून नव्हे, तर सरकारकडून भीक मागितल्यासारखा वाटतो, असे सांगत त्यांनी सत्ता रचनेलाच धक्का दिला.

Harshwardhan Sapkal : कोकाटेंची हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत नाही ?

मुख्यमंत्र्यांनी दिला दम 

हे प्रकरण केवळ विरोधकांच्या टीकेपुरते मर्यादित राहिले नाही, तर सत्ताधारी गटातील अनेक आमदारही कोकाटेंच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर नाराजी व्यक्त करत, मंत्रिमंडळात वादग्रस्त विधाने चालणार नाहीत, असा सज्जड दम भरल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

माणिकराव कोकाटे यांचा मी नाही, सरकारच भिकारी हा बचाव पुन्हा उलटाच पडल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांकडून घेतला जाणारा ‘एक रुपया’ हा मुद्दा उपस्थित करताना, त्यांनी अनवधानाने शासनालाच बदनाम केलं. शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, म्हणजे शासनच भिकारी आहे. या त्यांच्या विधानामुळे, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

मी वादाला पेलणारा

इतकेच नाही, तर कोकाटे यांनी पाच लाखांहून अधिक बोगस अर्जांचा पर्दाफाश झाला, हे माझ्याच काळात घडलं, हे सांगताना ‘मी वादाला घालणारा नाही, वादाला पेलणारा आहे’ हेच दाखवून दिलं. त्यांनी 52 जी.आर. काढल्याचा अभिमानही व्यक्त केला आणि पुढील सहा महिन्यात कृषी विभागात क्रांती घडेल, असे सांगत मोठे दावेही केले.

शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते. शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही. मी बोगस अर्ज रद्द केले, 52 आदेश काढले, कृषी विभागाचा नंबर तीन क्रमांकावर आला… मी काम करतोय, असे त्यांनी सांगितले.

राजकारण हे केवळ शब्दांचे खेळ नसतो, तो लोकांच्या भावनांचा आरसा असतो. माणिकराव कोकाटे यांच्या शब्दांनी शेतकऱ्यांऐवजी सरकारच भिकारी असल्याचा ठपका ठेवत, सत्ता यंत्रणेचं वस्त्रहरणच केलं आहे. आता त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली असून, मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!