महाराष्ट्र

Devendra Fadnavis : जिभेचा लगाव अन् मुख्यमंत्र्याचा झणझणीत झटका

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे पेटला नवा वाद

Author

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेला वणवा अजूनही शांत झालेला नाही. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पिकविमा दिला, या त्यांच्या विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शेतकऱ्यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. आता, या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना आधीच विधानसभेत रमी खेळल्यामुळे वादात असताना कोकाटे यांनी पुन्हा एकदा धगधगते विधान केलं. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही, असे कोकाटे म्हणाले. यातूनच नवा वाद उफाळून आला आहे.

या प्रकरणावर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडत थेट प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटेंच्या विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांनी त्यांच्या कानावर शब्दशः चिमटा घेतला. “ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, पण जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल, तर मंत्र्यांनी असे बोलणं अयोग्य आहे,” असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे कोकाटेंना समज दिली. याचबरोबर, त्यांनी स्पष्ट केलं की पिकविमा योजनेत सरकारने जाणीवपूर्वक बदल केला आहे. मागील काही वर्षांत विमा कंपन्यांनी जास्त फायदा उचलला होता, आणि हे लक्षात घेतल्यानंतर सरकारने ही संपूर्ण प्रणालीच बदलण्याचा निर्णय घेतला.

खपवून घेणार नाही

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना मदतीचा लाभ पोहोचावा, म्हणून दरवर्षी 5 हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे धोरण यंदापासून लागू करण्यात आले असून, पुढील पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये शेती क्षेत्रात गुंतवले जातील. अशा महत्त्वाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जर मंत्रीच गैरसमज पसरवतील, तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.

दुसरीकडे, कोकाटेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना केलेलं विधान अधिकच गोंधळ निर्माण करणारं ठरलं. त्यांनी म्हटलं, “शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं. शेतकऱ्यांना शासन एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण? शासन, शेतकरी नाही!” या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पुन्हा एकदा वादात उडी घेतली. ते पुढे म्हणाले की, एक रुपयाची रक्कम फारच क्षुल्लक असल्याने अनेकांनी बोगस अर्ज भरले. त्यांच्या कार्यकाळात साडे पाच लाख बोगस अर्ज उघडकीस आले असून, ते सर्व रद्द करण्यात आले आहेत. त्यांनी आतापर्यंत ५२ जीआर जारी केल्याचा दावा केला आणि पुढील सहा महिन्यांत कृषी विभागात मोठे बदल दिसून येतील, असंही ते म्हणाले.

स्वाभिमानाचा अवमान

मात्र, शेतकरी संघटनांनी या स्पष्टीकरणावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मंत्री आपल्या कामगिरीचा दाखला देऊन शेतकऱ्यांच्या भावना झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकाटेंच्या शब्दांतून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा अवमान झाला आहे. शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली खदखद ही योजनांच्या संख्येने मिटत नाही, तर संवेदनशीलतेनेच मिटू शकते आणि तीच या सरकारकडून सध्या हरवत चालली आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा म्हणजे मंत्रिमंडळात वावरणाऱ्या वादग्रस्त सुरांवर नियंत्रण आणण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र, कोकाटे यांचे विधान आणि त्यावरील स्पष्टीकरण यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. आता फडणवीस हे कोकाटेंवर कारवाई करणार का? की हे वादविवाद निवळेपर्यंत शांत राहणार? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एक मात्र नक्की, शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाच्या मुद्द्यावर कुठलाही राजकीय थट्टा सहन केला जाणार नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!