महाराष्ट्र

Sulbha Khodke : एक रोप अजितदादांसाठी, हजार सावल्या महाराष्ट्रासाठी

Ajit Pawar Birthday : उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला अमरावतीत नव्या भविष्याची रुजवण

Author

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत 66 हजार वृक्ष लागवडीची सुरुवात झाली. वाढदिवसाचा उत्सव पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करत हरित महाराष्ट्राची सुंदर शपथ घेण्यात आली.

राजकारण म्हणजे केवळ घोषणा आणि भाषणांचा खेळ नसतो, तर ती असते संवेदनशीलतेची आणि जबाबदारीची भावना. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या पुढाकारातून अमरावतीमध्ये 66 हजार वृक्ष लागवडीच्या भव्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा वाढदिवस केवळ औपचारिकता नव्हता, तर तो एक ‘हरित महाराष्ट्र’ घडवण्याचा सजीव संकल्प होता.

कार्यक्रमाची सुरुवात अमरावतीच्या कुलस्वामिनी श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीच्या महाआरतीने झाली. आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवार यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो, अशी प्रार्थना देवी चरणी अर्पण केली. यावेळी आमदार संजय खोडके व यश खोडके यांचीही उपस्थिती होती. आरतीनंतर गोमाता पूजन, चारा वाटप आणि पारंपरिक गूळतुला करत, भारतीय संस्कृतीची आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा कार्यक्रम अधिकच पवित्रतेने नटला.

Devendra Fadnavis : जिभेचा लगाव अन् मुख्यमंत्र्याचा झणझणीत झटका

हिरवा हात 

यानंतर कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे 66 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ. मोर्शी रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर आणि वलगाव मार्गावरील जमील कॉलनी येथील महानगरपालिका शाळा परिसरात ज्यांभूळ, बकुळ, कडुनिंब, आवळा, आंबा, बेल यासारख्या देशी आणि पर्यावरणपूरक प्रजातींची लागवड करण्यात आली. सुलभा खोडके यांनी यावेळी सांगितले, हे वृक्षराजी लावणं म्हणजे निसर्गाच्या मिठीत एक हिरवा हात देणं आहे. झाडे लावूया, झाडे जगवूया आणि पर्यावरण संतुलनासाठी सामूहिक जबाबदारी पेलूया.

या उपक्रमाचा विशेष भाग म्हणजे प्रत्येक झाडाला दिले जाणारे युनिक क्रमांक आणि त्याच्या संगोपनाची काळजी घेण्याचा संकल्प. अमरावतीतील प्रत्येक प्रभागातील मोकळ्या जागांवर ही झाडे लावण्यात येणार असून, त्यांची देखभाल, वाढ आणि सुरक्षा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेणार आहेत. हे केवळ वृक्षारोपण नव्हते, तर प्रत्येक रोपामागे एक विचार आणि सामाजिक बांधिलकी होती.

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात दळवळणारं देवाभाऊ नावाचं अत्तर 

हरित भविष्य

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शिक्षण, पर्यावरण, कला, क्रीडा, वैद्यकीय सेवा, उद्योग, सामाजिक संस्था अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, युवक-युवती यांनीही सहभागी होऊन या उपक्रमात योगदान दिले. सर्वांनी मिळून अमरावतीच्या भूमीत ‘हरित भविष्य’ रोवले आणि त्याच्या सावलीत एक विकसित महाराष्ट्र साकारण्याचा संकल्प केला.

सडेतोड नेतृत्व, कामाविषयी निष्ठा आणि प्रशासनावरची मजबूत पकड या गुणांनी युक्त असलेले अजितदादा पवार हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते एक धोरणात्मक विचारवंतही आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेला हा वृक्षारोपण उपक्रम म्हणजे त्यांच्या विचारांना आणि कार्यशैलीला हिरवा सलाम आहे.

अशा उपक्रमांमधून राजकारणाला नवा चेहरा मिळतो, सामाजिक उत्तरदायित्वाचा, पर्यावरण जपण्याचा आणि भावी पिढ्यांना शुद्ध श्वास देण्याचा. सुलभा खोडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या हरित मोहिमेमुळे अमरावतीने केवळ वृक्षलागवड केली नाही, तर पुढील पिढीसाठी एक हरित वारसा जपण्याचं व्रत घेतलं. दादांचं नाव, प्रत्येक झाडात जपलं जाईल, हिरव्यांच्या साक्षीनं, निसर्गाशी नातं घट्ट केलं जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!