महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अति डाव्या विचारांच्या गर्भगृहात राहुल गांधी

Public Safety Bill : जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर अति डाव्या विचारांनी ग्रस्त असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जन सुरक्षा विधेयकाविरोधातील काँग्रेसचा यूटर्न हा राहुल गांधींच्या आदेशामुळेच झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

राहुल गांधी अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त झाले असून त्यांच्या भोवती आता देशविरोधी विचारांचा कट्टा तयार झाला आहे, अशी ठाम टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळात नुकतेच मंजूर झालेले जन सुरक्षा विधेयक हे आता नव्या वादळाचे कारण ठरत आहे. काँग्रेसकडून या विधेयकाला विरोध होत असताना, फडणवीसांनी या आंदोलनामागे राहुल गांधींचा आदेश आणि डाव्या गटांचा दबाव असल्याचा स्पष्ट आरोप केला.

फडणवीस म्हणाले की, या विधेयकातील प्रत्येक मुद्द्यावर संयुक्त चिकित्सा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली होती. काँग्रेसच्या प्रतिनिधींनीही त्यात भाग घेतला होता. त्यावेळी एकही आक्षेप नोंदवला गेला नाही. त्यामुळे आता काँग्रेसचा अचानक झालेला विरोध हा फक्त राजकीय स्टंट आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. काँग्रेसला स्वतःचं मत नसून राहुल गांधी काय म्हणतात, यावर सगळं ठरतंय, अशी टीका त्यांनी केली.

Sulbha Khodke : एक रोप अजितदादांसाठी, हजार सावल्या महाराष्ट्रासाठी

भारताच्या मूळ विचारधारेपासून दूर

मुख्यमंत्र्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितलं की, राहुल गांधी यांना अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी वेढलं आहे. हे लोक देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर कायमच शंका घेतात आणि कायदा-सुव्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेतात. आज राहुल गांधींना सल्ला देणारे लोक हे भारताच्या मूळ विचारधारेपासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये अति डाव्या विचारांची छाया स्पष्टपणे जाणवते, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरच थेट घाव घातला.

‘जन सुरक्षा विधेयक’ हे सरकारने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणले असल्याचं सांगताना फडणवीसांनी स्पष्ट केलं की, हे विधेयक म्हणजे कोणताही हुकूमशाही निर्णय नाही, तर सहमतीने तयार झालेला कायदा आहे. आज देशात आणि राज्यात सायबर गुन्हेगारी, दहशतवादी संपर्क, आणि अंतर्गत विघटनाचं धोका वाढतोय. त्याविरोधात मजबूत यंत्रणा उभी करणं आवश्यक होतं, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis : जिभेचा लगाव अन् मुख्यमंत्र्याचा झणझणीत झटका

स्वातंत्र्यावर गदा

काँग्रेस मात्र या विधेयकाला लोकशाहीविरोधी ठरवत आहे. त्यांच्या मते, या विधेयकाच्या माध्यमातून सरकारला अनावश्यक अधिकार दिले जात आहेत, जे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकतात. पण फडणवीस म्हणतात, काँग्रेसचा विरोध हा लोकशाहीच्या मूल्यांसाठी नसून राजकीय स्वार्थासाठी आहे.

या सर्व वादविवादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. एकीकडे भाजप सरकार सुरक्षा यंत्रणेला बळकट करण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस हे विधेयक लोकशाही धोक्यात टाकणारे म्हणून दर्शवत आहे. मात्र, फडणवीसांची राहुल गांधींवरची टीका हे दर्शवते की, हे आंदोलन केवळ राजकीय रणनीती असून त्यामागे गंभीर वैचारिक संघर्ष सुरु आहे.

राज्याच्या राजकारणात आता प्रश्न उभा राहतो की, सुरक्षेच्या नावाखाली अधिकार वाढवले जात आहेत की लोकशाहीच्या नावाखाली देशविरोधी विचारांना प्रोत्साहन दिलं जातंय? निर्णय जनतेला घ्यायचा आहे, पण फडणवीसांनी केलेले आरोप काँग्रेससाठी मात्र मोठं आव्हान ठरणार आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!