महाराष्ट्र

C.P Radhakrishnan : भाषा शिकण्यासाठी हात उगारणे गरजेचे आहे का?

Marathi Language : मराठी - अमराठी वादावरून राज्यपालांची भूमिका

Author

मराठी येत नाही म्हणून मारहाण? मग ती लगेच येईल का? असा खडा सवाल करत राज्यपाल राधाकृष्णन यांनी भाषावादावर थेट प्रतिक्रिया दिली. भाषेच्या नावावर दहशत पसरवू नका, असं स्पष्ट आवाहनही त्यांनी केलं.

राज्यपालांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केला आहे. जर मला मराठी बोलता येत नसेल म्हणून कोणी मला मारहाण केली, तर त्यामुळे मी लगेच मराठी बोलायला लागणार आहे का? असा खडा सवाल राज्यपालांनी केला. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मराठी–अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर भाषेच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

राज्यपालांनी कोणत्याही नेत्याचे वा पक्षाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख महाराष्ट्रातील विरोधी पक्ष, विशेषतः ठाकरे बंधूंवर असल्याचे स्पष्ट जाणवत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्राला विरोध करत हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी काही हिंदी भाषिकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी भाषेच्या नावाखाली हिंसाचाराच्या प्रकारावर भाष्य केलं.

Devendra Fadnavis : अति डाव्या विचारांच्या गर्भगृहात राहुल गांधी

मारहाण उपाय नाही

आपल्या खासदारकीच्या काळातील एक किस्सा सांगताना राज्यपाल म्हणाले, तामिळनाडूत रात्री 9 वाजता मी एका ठिकाणी गेलो. काही लोक एका गटावर फक्त ‘तमिळ येत नाही’ म्हणून मारहाण करत होते. मी त्यांच्या जवळ गेलो आणि विचारणा केली. ते लोक माझ्याशी हिंदीत बोलू लागले, पण मलाच हिंदी येत नव्हतं. मग मी स्वतःला विचारलं की, जर कुणाला एखादी भाषा येत नसेल, तर त्याला मारहाण केल्याने ती लगेच येईल का?

राज्यपालांनी या उदाहरणाच्या माध्यमातून भाषेच्या नावावर निर्माण होणाऱ्या असहिष्णुतेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर अशा घटनांचा पगडा वाढला, तर महाराष्ट्रात गुंतवणूकदार का येतील? दहशतीच्या वातावरणात कुणीच गुंतवणूक करणार नाही. आपण दीर्घकाळासाठी राज्याला वेदना देत आहोत, असेही ते म्हणाले.

राजकीय हेतू नाही

राधाकृष्णन यांनी सांगितले की, त्या घटनेनंतर त्यांनी पीडित लोकांची माफी मागितली, त्यांना अन्न दिलं आणि त्यांचं मन जाणून घेतलं. पण हे सांगताना ते म्हणाले, मी हे राजकीय हेतूने सांगत नाही, तर समाजाला आरसा दाखवण्यासाठी सांगतो आहे. भाषेवरून आपल्यात द्वेष पसरू लागला, तर हे आपल्या सहअस्तित्वाच्या संस्कृतीला धोका आहे, असा त्यांचा स्पष्ट इशारा होता.

भाषा शिकणे महत्त्वाचे आहे, परंतु ती जबरदस्तीने लादता येत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ते म्हणाले, आपल्याला अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत, पण त्याच वेळी आपल्या मातृभाषेचा अभिमानही असावा. मात्र, तो अभिमान इतरांवर लादण्याचा अधिकार कुणालाही नाही.

एकतेची रचना उध्वस्त

राज्यपाल पुढे म्हणाले, मी आजही अनेक भाषांमध्ये संवाद साधतो. पण भाषेचा गर्व असावा, दर्प नाही. भाषेच्या नावावर समाज फोडण्याचं काम केलं जात असेल, तर आपण भारताची एकतेची रचना उध्वस्त करतो आहोत. भाषेच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी ही बाब अधोरेखित केली.

राज्यपालांनी भाषेच्या सहिष्णुतेसाठी समाजाला आवाहन करताना म्हटले, आपण भाषा ही सेतूप्रमाणे वापरली पाहिजे, भिंतीसारखी नव्हे. आपल्या विविधतेतच आपल्या राष्ट्राची खरी ताकद आहे. जोपर्यंत आपण एकमेकांच्या भाषेचा सन्मान करतो, तोपर्यंत भारताचा आत्मा जिवंत राहील. या भाषणातून राज्यपालांनी एका संवेदनशील सामाजिक मुद्द्याला योग्य त्या शब्दांत, परंतु अत्यंत प्रभावी शैलीत मांडलं. हे भाषण केवळ भाषेपुरतं न राहता, सहिष्णुता, एकात्मता आणि सौहार्दाचा मोठा संदेश देतं की, जे आजच्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अत्यंत आवश्यक आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!