महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ‘बेटी बचाओ’ घोषणा ठरली

Nagpur : ओबीसी वसतिगृहात घुसखोरी, मुलींचा विनयभंग

Author

नागपूरमधील सरकारी वसतिगृहात रात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. सुरक्षेच्या अभावामुळे ही धक्कादायक घटना घडली.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या शहराचे प्रतिनिधित्व करतात, तिथेच मुली सुरक्षित नसतील तर राज्यभरातील स्थिती काय असेल, असा सवाल सध्या प्रत्येक नागरिक विचारत आहे. नागपूरमधील एका सरकारी मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री घडलेली धक्कादायक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. या वसतिगृहात दोन अज्ञात आरोपी (22 जुलै 2025) रात्रीच्या वेळी घुसले आणि एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. एवढ्यावरच थांबले नाही, तर पीडितेचा मोबाईलही चोरून आरोपी फरार झाले. 22 जुलैच्या मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली.

नागपूरमधील ओबीसी मुलींसाठी असलेल्या एका सरकारी वसतिगृहात 64 मुली वास्तव्यास आहेत. त्यातील एका विद्यार्थिनीच्या खोलीत आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश केला. दाराची कडी तोडून आत घुसले आणि तिचा विनयभंग केला. यावेळी वसतिगृहात कोणतीही सुरक्षा व्यवस्था कार्यरत नव्हती, सीसीटीव्ही तर दूरच, अगदी दरवाज्याला योग्य लॉकही नव्हते. या घटनेनंतर वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुली आता आपल्या खोलीत सुद्धा सुरक्षित नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis : उभं राहतंय स्टीलचं साम्राज्य, पण काहींना खूप जड जातंय परिवर्तन

आरोपी अद्याप फरार

वसतिगृहाच्या अगदी जवळच दारूचे दुकान आहे. त्यामुळे मुलींना जाताना-येताना कायम असुरक्षित वाटते, हा देखील एक गंभीर मुद्दा म्हणून समोर येत आहे. या घटनेची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मात्र आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिसांचा धाक गुन्हेगारांच्या मनातून संपला आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलींच्या वसतिगृहात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, सीसीटीव्ही नाही, दरवाजे लॉकही नीट नाहीत, कोणाच्या भरोश्यावर या मुली राहणार? असा जाहीर सवाल त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, या वसतिगृहात तात्काळ सीसीटीव्ही बसवले गेले पाहिजेत. आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे. एवढेच नव्हे, तर राज्यभरातील सर्व मुलींच्या वसतिगृहांत खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. सरकारने या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी झटकू नये. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे. कारण हे शहर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे निवासस्थान आहे. जर याच शहरात मुलींची सुरक्षितता धोक्यात असेल, तर राज्यातील इतर भागांत परिस्थिती किती गंभीर असेल, हे सहज समजते.

C.P Radhakrishnan : भाषा शिकण्यासाठी हात उगारणे गरजेचे आहे का?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!