राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाने आता राजकीय भूकंप घडवला असून, भाजप नेत्याचे नाव समोर येताच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्ताधारी मंडळात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्यात गदारोळ माजवला आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार सुमारे 72 अधिकारी या रॅकेटमध्ये अडकले आहेत. त्यांच्याशी संबंधित अनेक गुप्त व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांचं नाव चर्चेत आलं आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून थेट भाजपवर आणि राज्य सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे प्रकरण केवळ एखाद्या नेत्याच्या चुकीपुरते मर्यादित नाही. यामध्ये मोठे अधिकारी, आजी-माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचाही समावेश आहे. एका संगठित रॅकेटच्या माध्यमातून या प्रकरणात किमान 200 कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे. लोढा याने संबंधित व्हिडिओंच्या आधारे अनेकांकडून पैसे उकळले आहे. हे फक्त आर्थिक नव्हे तर राजकीय आणि प्रशासकीय शोषणाचं भयावह स्वरूप आहे, असा आरोप त्यांनी केला.
Yashomati Thakur : बलात्काराचे आरोप, खंडणीचे व्यवहार हेच का तुमचे रामराज्य
सामान्य व्यक्तीवर तत्काळ कारवाई
वडेट्टीवार पुढे म्हणाले, ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय, त्यावर कोणतीही तत्काळ कारवाई होत नाही. सुरज चव्हाण नावाच्या कार्यकर्त्यावर अमानुष मारहाण झाली तरी त्यावर प्रशासन शांत का आहे? सामान्य व्यक्तीला पोलिस पटकन उचलतात, पण सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्याला वाचवलं जातं. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा प्रकारांना पाठिंबा देत आहेत का? हे स्पष्ट झालं पाहिजे.
या संदर्भात त्यांनी भाजप सरकारवर थेट टीका करत म्हटलं की, जर रमी खेळणारा मंत्री कृषीमंत्री असेल, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारा माणूस सभागृहात बेजबाबदार वर्तन करत असेल आणि सरकार त्याचं समर्थन करत असेल, तर हे सरकार शरमेचं पातळं पार करतंय. या सरकारकडे संवेदनशीलता, जबाबदारी आणि नैतिकतेचा जराही भान उरलेला नाही.
झाकलेले चेहरे बाहेर येतील
हे फक्त लोढ्याचं प्रकरण नाही, यामागे मोठं रॅकेट आहे. अजून अनेक चेहरे उघड होणं बाकी आहे. मी कोण कोणाचा कार्यकर्ता आहे हे आज सांगणार नाही. पण झाकलेले चेहरे नक्कीच लवकर बाहेर येतील, असा सूचक इशारा देत वडेट्टीवारांनी यामागे चालणाऱ्या राजकीय संरक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्यापेक्षा वर कोणताही नेता नाही, असं म्हणणाऱ्या सरकारने जर आता कारवाई केली नाही, तर याचा अर्थ अनेक गोष्टी झाकल्या जात असल्याचं सिद्ध होईल. हनी ट्रॅप प्रकरणाचे अजूनही अनेक धागेदोरे खुलायचे बाकी आहेत आणि पुढील काळात या प्रकरणाचा राजकीय भूकंप होणार यात शंका नाही.