राज्यात शेतकरी कर्जमाफी अद्याप जाहीर न झाल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहे. अमरावतीतील बँक मॅनेजरला शेतकरी कर्जवसुलीवरून सुनावले.
राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून पेटलेला असताना अजूनही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारकडून कर्जमाफीसाठी आश्वासनं देण्यात आली, निधी जाहीर करण्यात आला पण प्रत्यक्षात अद्याप काहीच घडलं नाही. हिवाळी अधिवेशन पार पडलं, उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपले पावसाळी अधिवेशन गाजले पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अजूनही चर्चेतच अडकून राहिलाय. या पार्श्वभूमीवर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट रणधुमाळी पुकारली आहे.
शेतकऱ्यांवर बँकांकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली, त्यावर सरकारचा मौन आणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली निराशा यामुळे बच्चू कडू यांनी आपल्या शैलीत आक्रमक पवित्रा घेत थेट बँक मॅनेजरलाच इशारा दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडे गावातील एका शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाकडून कोणतीही नोटीस न देता थेट घर हरजाबाबत धमकी दिल्याचा आरोप केला. यामुळे संबंधित शेतकरी इतका मानसिक तणावात आला की आत्महत्येचा विचार करावा लागला. ही माहिती मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट बँक मॅनेजरला फोन करून खडसावत सांगितले की, सक्तीची वसुली केलीत तर तिथेच ठोकून काढीन.
Devendra Fadnavis : शुभेच्छांचे राजकारण नको, सौजन्याचं नातं समजून घ्या
उपोषणानंतरही मौन कायम
हिम्मत असेल तर माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करा. कर्जमाफीची घोषणा अद्याप सरकारकडून झाली नसताना बँकांकडून सक्तीने वसुली केली जात आहे, हे अन्यायकारक असल्याचं सांगत त्यांनी मॅनेजरला विचारलं उद्या सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यास शेतकऱ्यांनी भरलेले पैसे परत करणार आहात का?बच्चू कडू इथेच थांबले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले घाबरू नका, जर बँक वसुलीसाठी दबाव आणत असेल तर मला एक मेसेज करा, त्यानंतर काय करायचं ते मी पाहतो. त्यांनी पुन्हा एकदा ठाम इशारा दिला जर सक्तीची वसुली सुरूच ठेवली, तर बँक मॅनेजरलाच त्याच्या बँकेत टांगून ठेवू.
कडूंचा हा इशारा फक्त एका बँकेपुरता नव्हता, तर राज्यभरातील सर्व बँकांसाठी होता. शेतकऱ्यांवर अनाठायी दबाव आणणाऱ्या व्यवस्था आणि व्यवस्थापकांना बच्चू कडूंचा थेट इशारा स्पष्ट होता. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वीही प्राणांतिक उपोषण केले होते. तेव्हा सरकारने समिती गठीत करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिली होती. पण प्रत्यक्षात काहीच न घडल्याने आणि त्याचवेळी बँकांनी पुन्हा वसुलीचा जोर धरल्याने बच्चू कडू आता अधिक संतप्त झाले आहेत. बच्चू कडू यांच्या या आक्रमक भूमिकेने सरकार आणि बँका दोघांनाही विचार करायला लावलं आहे. शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा दाखवला आहे.
Parinay Fuke : टिळकांचा वारसा आता नितीन गडकरींच्या कृतीत झळकणार