महाराष्ट्र

Bacchu Kadu : सभागृहात रमीचा खेळ, नागपूरच्या रस्त्यांवर प्रहारचा उद्रेक

Nagpur : बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाचे राज्यभर उमटू लागले पडसाद

Author

सभागृहात चाललेला पत्त्यांचा खेळ आणि बच्चू कडू यांच्या समर्थकांचा रस्त्यावर उसळलेला संताप राज्यभरात उमटत आहे. नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात अचानक थांबली वाहतूक आणि सुरु झाला सरकारला हादरवणारा ‘प्रहार’

राज्याचे मंत्री विधीमंडळात बसून रमी खेळत असताना, दुसरीकडे शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर. हा विरोधाभास असह्य झाला आणि अखेर नागपूरच्या रस्त्यांवर प्रहार जनशक्तीचा ज्वालामुखी फुटला. 24 जुलै गुरुवारी नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात प्रहार संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन करत सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

शेतकरी कर्जबाजारी आहेत, हमीभावाच्या प्रतीक्षेत आहेत आणि दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळांसह हातमजुरांच्या जीवनात अंधार आहे. त्यावर सरकार केवळ आश्वासनांची चादर ओढते आहे. शेतकऱ्यांच्या या वेदना घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्तीने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत नागपूरमध्ये आंदोलन अधिकच तीव्र झाले.

वाहतूक ठप्प

ऑटोमोटिव्ह चौकात सकाळी 10 वाजता प्रहारचे कार्यकर्ते दाखल झाले आणि काही क्षणांतच वाहतूक ठप्प झाली. चारही दिशांनी वाहनांची रांग लागली. शहरात मोठ्या प्रमाणात कामासाठी जाणाऱ्या मजुरांनाही या आंदोलनाचा फटका बसला. यामुळे नागपूर शहराची वाहतूक यंत्रणा दोन तास पूर्णतः कोलमडली.

या आंदोलनाच्या माध्यमातून 17 प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या गेल्या. त्यामध्ये शेतमालाला योग्य हमीभाव, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांग नागरिकांना दरमहा 6 हजारांचा भत्ता, मेंढपाळ, मच्छिमार आणि दुग्धव्यवसायिकांसाठी आर्थिक मदत, तसेच हातमजुरांसाठी हमखास रोजगाराची मागणी समाविष्ट आहे. या मागण्या केवळ आकडेवारी नव्हत्या, तर वर्षानुवर्षे तुटलेल्या जनतेच्या अस्मितेचा आवाज होता.

पोलिसांची धावपळ

या आंदोलनामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 27 आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, आंदोलक मागे हटले नाहीत. उलट, त्यांनी ठामपणे सांगितले की, हे केवळ सुरुवात आहे; शेतकऱ्यांच्या थट्टेखोर धोरणांवर सरकारला आता जाब द्यावाच लागेल.

संपूर्ण ऑटोमोटिव्ह चौक परिसर हा कामगारवर्गाचा आहे. शहरातील विविध विकास कामांवर जाणारे अनेक मजूर याच मार्गाने जातात. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या हातमजुरांची मोठी दमछाक झाली. आंदोलकांनी यावरून स्पष्टपणे सरकारला दोषी धरत म्हटले की, शेतकरी आणि कामगार यांच्या आयुष्याशी खेळणारे मंत्री जर रमीमध्ये रमले, तर अशा सत्तेला रस्त्यावर उतरूनच जागं करावं लागतं.

या चक्काजाम आंदोलनामुळे सरकारला स्पष्ट संदेश दिला गेला आहे की, जर तुम्ही मंत्रिमंडळात खेळ खेळणार असाल, तर रस्त्यांवरचा जनतेचा हा आवाज कोणतीही व्यवस्था बधीर करून टाकू शकतो. हा केवळ आजचा संताप नव्हता, तर अनेक वर्षांच्या अन्यायाची चीड होती, जी आज नागपूरच्या चौकात तडाखेबंद फुटली.

आंदोलनाचं नेतृत्व प्रहारचे शहराध्यक्ष अमोल इसपांडे, पूर्व नागपूर अध्यक्ष सागर लाडेकर, पश्चिम नागपूर अध्यक्ष कविश्वर राऊत, उत्तर नागपूर अध्यक्ष श्याम रहांगडाले, दिव्यांग विभागप्रमुख धरम पडवार, मध्य नागपूर अध्यक्ष जितू लोढे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष राजेश जयस्वाल यांनी केलं. त्यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना रस्त्यावर उतरवून मांडल्या.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!