राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि रुक्मिणी माता मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आठ दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्याचे ठाम आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
तपश्चर्या म्हणजे केवळ डोंगरात एकांतवास नव्हे, तर जनजागृती, स्वच्छतेचं व्रत आणि ग्रामविकासाचं दिव्य कार्य. ही शिकवण दिली संत गाडगेबाबांनी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. याच तत्त्वांवर उभं असलेलं महाराष्ट्रातील तीन पवित्र तीर्थक्षेत्रं मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर आता नव्या उजेडात झळकणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आदेश देत या तीनही ठिकाणांच्या सर्वांगीण विकासासाठी आठ दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील मंत्रालयात नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर लगेचच ही बैठक बोलावण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मोझरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मभूमी, वलगाव संत गाडगे महाराजांची जीवनशैली जिथे मूर्त झाली आणि कौंडण्यपूर रुक्मिणी मातेला अर्पण झालेली आस्था. या तिन्ही स्थळांच्या प्रलंबित विकास कामांचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.
High Court : गडचिरोली पोलीसांच्या वागणुकीवर न्यायालयाचा कोसळला कोप
तातडीने कामे पूर्ण करावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, या पवित्र स्थळांचा विकास केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ म्हणून होणे आवश्यक आहे. त्यामुळे कामं उशिरा नकोत, आठ दिवसांत अंदाजपत्रक तयार करून मला सादर करा. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, या स्थळांच्या नियमित देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम (ता. तिवसा, जि. अमरावती) यांच्याकडे सोपवण्यात येईल. मात्र ही जबाबदारी हस्तांतर करताना संबंधित संस्थांची आर्थिक क्षमता, व्यवस्थापन कौशल्य, आणि स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीची तयारी यांचा सखोल विचार करूनच निर्णय घेण्यात यावा, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
या तीन तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व प्रचंड आहे. मोझरी तुकडोजी महाराजांचे ‘ग्रामगीता’ साकारणारे तीर्थ, जिथून सामाजिक क्रांतीचं वादळ उठलं. वलगाव संत गाडगे महाराजांचा कर्मयोग, स्वच्छतेचा खरा संदेश जिथे साकार झाला. तर कौंडण्यपूर रुक्मिणी माता मंदिर, श्रद्धेचं अपार केंद्र, हजारो भाविकांची आस्था जिथं दररोज नव्याने उगम पावते.
परिवर्तनाची साक्ष
या स्थळांच्या विकासासाठी केवळ रस्ते, सुविधा आणि सौंदर्यीकरण न करता सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून सर्वांगीण उभारणी करण्यावर भर दिला जाणार आहे. ही स्थळं केवळ मंदिर म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची साक्ष देणारी प्रेरणास्थळं म्हणून विकसित केली जाणार आहेत. या उपक्रमामुळे अमरावती जिल्हा आणि विदर्भातील धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनास नवी चालना मिळणार असून, स्थानिकांना रोजगार, कौशल्यविकास, आणि नव्या संधींचा मार्गही खुले होणार आहे.
या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार संजय बनसोडे, आमदार राजेश वानखेडे, आमदार संजय खोडके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. मनिषा वर्मा, अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), तसेच श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाचे प्रतिनिधी जनार्दन बोथे आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.