महाराष्ट्र

Yavatmal : ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव, आतमध्ये विदेशी दारूचा साठा

Liquor : नागपूरला जात असताना पुसदमध्ये लाखोंचा गूढगुंठा उघड

Author

पुसदमध्ये एका ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव झळकवणाऱ्या ट्रकवर विदेशी दारूचा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एका ट्रकवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव झळकत असतानाच, त्या ट्रकमधून परदेशी दारूच्या बॉक्सची अवैध विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार पुसद शहरात उघडकीस आला आहे. ‘मेघनादीदी साकोरे (बोर्डीकर)’ असं नाव ठळकपणे लिहिलेल्या एमएच-12-वाईबी-0048 या क्रमांकाच्या ट्रकवर पोलिसांनी 24 जुलै रोजी छापा टाकला. पुण्यातील हडपसर येथून आलेल्या या ट्रकमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 18 हजार 288 बाटल्या ग्रीन लेबल विदेशी दारू आढळून आल्या. या संपूर्ण कारवाईत एकूण 64 लाख 72 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या थरारक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायातील उच्चभ्रू परसाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मनीष ईश्वर सुरूळे (कोरेगाव, पुणे), प्रविण दत्ता जिजोरे (मानोरा, वाशीम), रामेश्वर मधुकर पवार, सचिन उदल चव्हाण, सतीश श्रावण चव्हाण, गोकुळ बाबूसिंग चव्हाण (महागाव, यवतमाळ) व विक्रम बळीराम जाधव (यवतमाळ) या व्यक्तींचा समावेश आहे.

शंका अधिक गडद

सदर ट्रकवर राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे (बोर्डीकर) असं नाव झळकत आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ अवैध दारू विक्रीपुरती मर्यादित राहत नाही, तर राजकीय पटलावरही या घटनेची पडसाद उमटत आहेत. प्राथमिक चौकशीत या ट्रकचा संबंध थेट मंत्र्यांच्या चुलत भावाशी असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. मात्र, खुद्द मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत.

पुसदच्या माहूर रोडवर गुरुवारी पोलिसांनी सापळा रचला आणि ट्रकसोबत उपस्थित असलेले काही जण परदेशी दारूचे बॉक्स विकताना रंगेहाथ पकडले गेले. यावेळी 180 मिलीच्या 18 हजार 288 बाटल्यांचा साठा, ज्याची बाजारात किंमत जवळपास 40 लाख 23 हजार 360 रुपये इतकी आहे, तो जप्त करण्यात आला. याशिवाय, 22 लाखांचा ट्रक, 99 हजारांचे सात मोबाइल फोन आणि दीड लाखाच्या तीन दुचाकी असा मोठा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला.

अनेक प्रश्न

ट्रकवर मंत्री महोदयांचं नाव लावण्यात नेमकी काय भूमिका होती? अवैध धंद्याला राजकीय प्रतिष्ठेचा आभास देऊन कायद्याला गंडवण्याचा प्रयत्न झाला का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या हे प्रकरण गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हाती घेतलं असलं तरी त्याचे राजकीय व सामाजिक पडसाद खोलवर जाणवू लागले आहेत. या कारवाईचं नेतृत्व जमादार अभिजीत सांगळे, पंकज पातुरकर व उमेश राठोड यांच्या पथकाने केले. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही संपूर्ण मोहिम राबवण्यात आली, जी अत्यंत यशस्वी ठरली.

या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, परवाना नसतानाही दारू विक्रीचा उद्योग कोणी चालवतंय आणि त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. ट्रकवर मंत्री नावाचा शिक्का असावा की झाकण्यासाठीचा मुखवटा? हे येणाऱ्या दिवसांत उलगडणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!