महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक आरोपांचा भडिमार केला आहे. सरकार डाकूंप्रमाणे वागत असून, राज्याची तिजोरी लुटली गेल्याचा घणाघात त्यांनी केला.
राज्यातील राजकारण सध्या प्रचंड खवखवतंय आणि त्याला पेटवणारे ठरले आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार. सत्तेच्या ऐशआरामातून सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तिजोरीची उधळपट्टी करत महाराष्ट्राचं भविष्यच गहाण ठेवलं आहे, असा सणसणीत आरोप त्यांनी केला. हे सरकार म्हणजे डाकूंच्या टोळीसारखं आहे. लुटालूट करणं, दहशत पसरवणं आणि शेतकऱ्यांपासून कंत्राटदारांपर्यंत सगळ्यांना आत्महत्येच्या टोकाला नेणं, अशी थेट टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे.
माणिकराव कोकाटेंनी जे म्हटलं, ते 100 टक्के खरं आहे. हे सरकार भिकारी झालं आहे. पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे हे भिकारी नाहीत, हे डाकू आहेत, असा गनगणीत आरोप करत वडेट्टीवारांनी टीकेची तोफ डागली.
राज्यात चड्डी-बनियन गँग, टॉवेल गँग उभी राहिली आहे. पैशाच्या नोटा बँगांमध्ये भरल्या जात आहेत आणि शेतकरी, निराधार, कंत्राटदार उपाशी मरत आहेत. राज्याच्या तिजोरीवर हात साफ करताना सत्ताधाऱ्यांना शरमेचं भानही उरलेलं नाही, असंही ते म्हणाले. त्यांच्यानुसार, राज्यात PWDचे तब्बल 88 हजार कोटी रुपये बाकी आहेत. आणि सरकारकडे आता हर घर नल योजनेसाठीही पैसा नाही.
Sanjay Rathod : पालकमंत्र्यांच्या आदेशांनी उगवतेय नोकरीचा नव प्रभात
निधी अजूनही मिळालेले नाहीत
राज्याचं प्रशासन आता टक्केवारीशाहीच्या विळख्यात आहे. कोणतंही काम करायचं असेल तर कमीत कमी 20 टक्के द्यावं लागतं. त्याशिवाय एकही फाईल पुढे सरकत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
जुलै महिना संपायला आला तरी जिल्हा नियोजन समितीचे (DPDC) निधी अजूनही मिळालेले नाहीत. पाच महिन्यांपासून निराधार योजनेचे लाभार्थी वाट पाहत आहेत. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आणि आता कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. हे जर असंच सुरू राहिलं, तर लवकरच राज्यात एकही कंत्राटदार उरणार नाही. संपूर्ण यंत्रणाच कोलमडेल.
तलवार नसलेली लढाईच
वडेट्टीवार यांची टीका याचवर थांबत नाही, गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये 25 बारबाला नाचतात, असा खळबळजनक आरोप करत ते म्हणाले, किमान तुम्ही मंत्री असताना तरी तो बार बंद ठेवा! आता जर त्या बारवर छापा टाकला जात असेल, तर ही तलवारी नसलेली पण थेट राजकीय लढाई आहे. ते पुढे म्हणाले, “सरकार जर फक्त चार मंत्र्यांवर कारवाई करत असेल, तर उद्या १४ मंत्र्यांचे फोटो बाहेर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री कारवाई करतानाही घाबरतो आहे. त्याचवेळी त्यांनी नाना पटोलेंचा बचाव करत, पेन ड्राईव्ह त्यांनी दिला नाही, पण त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्याचं कारण नाही, असंही स्पष्ट केलं.
राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती स्वातंत्र्यानंतर कधीच पाहायला मिळाली नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी गोळी झाडली. हे सरकार म्हणजे एक टोळी आहे, जी फक्त सत्ता उपभोगते आणि जनतेला लुटते. लोक मरत आहेत, आणि सरकार मौजमजा करतंय. ह्या टोळीला ना शरम उरलीय, ना जबाबदारीची जाणीव.