गडचिरोलीत ‘उपजिविका विकास कार्यक्रम’च्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे. शाश्वत शेती व रोजगारातून समृद्ध जीवनाची पहाट उजळू लागली आहे.
गडचिरोलीसारखा आकांक्षित आणि नक्षलग्रस्त भाग फक्त संकटांचा चेहरा नसतो, तर संधीचा कॅनव्हासही ठरू शकतो. हे सिध्द करणारा एक भव्य उपक्रम सध्या या जिल्ह्यात साकारत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रीय सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ राबवला जात आहे. तो या भागातील हजारो कुटुंबांच्या जीवनात नवे उजाळे घेऊन येतो आहे.
1 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात 49 गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम पुढील तीन वर्षांपर्यंत राबवण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे 20.34 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावणे, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि समाजाच्या आर्थिक स्वावलंबनास चालना देणे.
Devendra Fadnavis : उभं राहतंय स्टीलचं साम्राज्य, पण काहींना खूप जड जातंय परिवर्तन
समृद्धीचा मार्ग
उपजिविका विकास कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी शाश्वत आणि हवामानाशी सुसंगत शेती आहे. पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक आधुनिक आणि प्रभावी तंत्रांचा वापर करून उत्पन्नात वाढ करण्यावर भर दिला जात आहे. या अंतर्गत बोडी आधारित शेतीपद्धतीचा अवलंब करून, माशांचे संगोपन, त्यावर आधारित कुक्कुटपालन, आणि त्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. या प्रणालीमुळे शेती एकाच वेळी पाणी, प्रथिने आणि उत्पन्न देणारा स्रोत बनते, जे गावकऱ्यांना शेतीवर आधारित समृद्धीचा मार्ग दाखवते.
याशिवाय, शेतीतर उपजिविकांच्या संधींचाही या प्रकल्पात समावेश आहे. हस्तकला, पशुपालन, अन्न प्रक्रिया अशा क्षेत्रांमध्ये कौशल्यविकास व प्रशिक्षणाद्वारे स्थानिकांना अर्थार्जनाच्या नव्या शक्यता खुल्या केल्या जात आहेत. विशेषतः महिलांना या योजनांमध्ये अधिक सक्रियपणे सहभागी करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित केले जात आहे.
तुटवडा कमी होण्यास मदत
30 जून 2025 पर्यंत या उपक्रमात 2 हजार कुटुंबांची नोंदणी झाली आहे. 66 बोडींचे गाळमुक्तीकरणही करण्यात आले आहे. यामुळे त्या जलसाठ्यांची जलधारण क्षमता वाढवून, शेतीसाठी आवश्यक पाण्याचा तुटवडा कमी होण्यास मदत मिळाली आहे. हे काम फक्त एक तांत्रिक हस्तक्षेप नाही, तर ग्रामीण जीवनाच्या शाश्वततेसाठी आवश्यक असलेले मूलभूत परिवर्तन आहे.
या कार्यक्रमात सामूहिक उद्यमशीलतेलाही महत्त्व देण्यात आले आहे. शेतकरी गटांच्या माध्यमातून खरेदी-विक्री व्यवस्था उभारली जात असून, त्याद्वारे बाजारात शेतकऱ्यांची थेट पोहोच वाढेल. त्यामुळे त्यांना मध्यस्थांशिवाय चांगला भाव मिळू शकतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होतो.
आरोग्याची जागरूकता
योजनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आरोग्य आणि पोषण जनजागृती. गावोगाव पोषण शिबिरे, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन, माता-बाल आरोग्य विषयक उपक्रम राबवले जात असून, ग्रामीण जीवनशैलीत आरोग्याची जागरूकता वाढवली जात आहे. यात महिलांचा सहभाग विशेषत्वाने वाढवून त्यांच्याद्वारे कुटुंबातील आरोग्य व्यवस्थापनातही सकारात्मक बदल घडवला जात आहे.
या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे २०२७-२०२८ पर्यंत सहभागी कुटुंबांचे उत्पन्न त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत दुगुणे करणे. यामुळे केवळ आर्थिक समृद्धी नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक स्थैर्यदेखील निर्माण होईल. उपजिविकेच्या स्थिर मार्गांनी स्थानिक नागरिकांचे स्थलांतर थांबवले जाईल आणि गडचिरोली जिल्हा आत्मनिर्भरतेच्या दिशेने सक्षम पाऊल टाकेल.
या परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आता गडचिरोली फक्त लाल रेषांनी व्यापलेला जिल्हा न राहता, शाश्वत शेती, सामूहिक उद्योजकता आणि सशक्त नागरिकांच्या माध्यमातून समृद्धीचा नवा चेहरा घेऊन समोर येत आहे. ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ ही या नवक्रांतीची सुरुवात आहे आणि भविष्यातील सक्षम भारताचे एक प्रभावी पाऊलसुद्धा.